ओतूर (ता. जुन्नर) - ओतूर परिसरातील विलोभनीय निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी आलेल्या २१ वर्षीय पर्यटकाचा धुरनळी जवळील तलावात पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. २० जुलै) घडली. जहीरअली सराजू अन्सारी (वय २१, रा. नारायणगाव, मूळगाव पडरौना, ता. सिंगापट्टी, जि. कुसीनगर, उत्तरप्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे.अधिकच्या माहितीनुसार, जहीरअली अन्सारी हा आपल्या चार मित्रांसोबत ओतूर येथील धुरनळी परिसरात पर्यटनासाठी आला होता. रविवारी दुपारी अंदाजे ४ वाजता तो लघुशंकेसाठी गेला असता पाय घसरून तलावात पडला आणि बुडू लागला. त्यावेळी त्याच्या मित्रांसह इतर पर्यटक व स्थानिकांनी तत्काळ धाव घेऊन त्याला बाहेर काढले. तातडीने ओतूर येथील रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, पावसाळ्यामुळे ओतूर परिसरातील डोंगर-दऱ्यांनी हिरवाईची शाल पांघरली असून, फेसाळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. धबधब्यांच्या सौंदर्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांनी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या घटनेनंतर स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व संस्थांनी पर्यटकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. धबधब्याचे कोसळणारे पाणी तलावात जमा होत असल्याने पर्यटकांनी तिथे जाताना विशेष काळजी घ्यावी.
पाहायला गेला अन्…;ओतूर येथे पर्यटकाचा मृत्यू,परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 20:00 IST