- जयवंत गंधाले
हडपसर : फुरसुंगी, उरुळी देवाची नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक प्रथमच होणार असून, प्रारूप प्रभाग रचना प्रस्तावाला विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली असून एकूण १६ प्रभाग, दोन सदस्यांचा प्रभाग, अशी ३२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. सोमवारी अधिकृत प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली. सध्या या परिसरातील लोकसंख्या दीड लाखाच्या वर गेली असली तरी ही मागील जनगणनेनुसार ही रचना केलेली आहे.
या दोन्ही गावच्या ७५ हजार लोकसंख्येवर प्रभाग रचना केली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत हरकती, सूचना नागरिकांकडून मागवल्या आहेत. एक ते आठ सप्टेंबरदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे याची सुनावणी होईल. प्रथमच होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी प्रसाद शिंगटे यांनी फुरसुंगी येथील कार्यालयात प्रभाग रचना जाहीर केली. अनुसूचित जाती प्रवर्गात पाच जागा आणि इतर मागास प्रवर्गासाठी नऊ जागा राखीव असतील. यात अनुसूचित जाती प्रवर्गात तीन महिला आणि इतर मागास प्रवर्गात पाच महिला जागा राखीव ठेवल्या आहेत.
३१ पैकी १६ जागा राखीव
राखीव महिलांमध्ये आठ जागा राखीव ठेवल्या आहेत. या सर्व ३१ जागांपैकी एकूण सर्व राखीव महिलांकरिता १६ जागा राखीव ठेवल्या आहेत. नागरिकांना स्वतंत्रपणे सुनावणीसाठी वेळ दिला जाईल. एक ते आठ सप्टेंबरदरम्यान याची जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे सुनावणी करण्यात येईल, असे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी जाहीर केले आहे.