पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेला गणेशोत्सव निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या पथ्यावर पडला आहे. एकाच वेळी असंख्य मतदारांबरोबर संपर्क साधण्याची ही दांडगी संधी चुकू नये यासाठी बहुसंख्य इच्छुकांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आपल्या थैल्या मोकळ्या सोडल्या आहेत. आर्थिक मदतीबरोबरच कार्यकर्त्यांना सर्व प्रकारचा आश्रय इच्छुकांकडून दिला जात आहे.
अशी होती स्थिती
सलग तीन वर्षे महापालिकेची निवडणूकच झालेली नाही. दरम्यानच्या कालावधीत दोन ते तीन वेळा महापालिका निवडणूक होणार अशा वावड्या उठल्या. त्याही वेळी दिवाळी बरोबर अन्य सणांमध्ये इच्छुकांनी मतदारांसाठी फराळ वाटप, देवदर्शनाच्या सहली, मनोरंजनाचे जाहीर कार्यक्रम असा धुरळा उडवला. काहींनी जनसंपर्क कार्यालये सुरू केली. तिथे कार्यकर्त्यांबरोबरच मतदारांचीही बसण्या-उठण्याची व्यवस्था केली. मात्र त्यांचा खर्च झाला व महापालिका निवडणूक झालीच नाही. त्यामुळे इच्छुकांनी आपल्या थैल्यांची तोंडे आवळली होती. लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी खर्चाला आवर घातला. काहींनी तर थेट व्यवसाय, उद्योग याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. प्रभागामध्ये फिरण्याचा दिनक्रम तर बऱ्याच इच्छुकांनी बंदच करून टाकला.
आता निवडणूक होणारच
आता मात्र सर्वोच्च न्यायालयाचाच आदेश असल्याने महापालिका निवडणूक होणारच आहे, त्यामुळेच पुन्हा एकदा त्यांनी खर्च करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच गणेशोत्सव आल्याने एकाच वेळी असंख्य मतदारांशी संपर्क करण्याची संधी म्हणून या उत्सवाकडे पाहिले जात आहे. प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने इच्छुकांसमोर आता आपापला प्रभाग जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळेच या परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना भेटणे, त्यांची मागणी लक्षात घेणे, त्याप्रमाणे त्यांची व्यवस्था करणे असे प्रकार सुरू झाले आहेत. त्या बदल्यात मंडळ परिसरात छायाचित्रांसहित फ्लेक्स लावू देणे, कार्यक्रमांना प्रमुख उपस्थिती ठेवणे, मतदारांबरोबर ओळखी करून देणे अशा अपेक्षा ठेवल्या जात आहेत.
मंडळांना उदार आश्रय
बहुतेक इच्छुकांची त्यांच्या हक्काच्या परिसरात स्वत:ची सार्वजनिक मंडळे आहेतच, मात्र एका प्रभागात चार नगरसेवक निवडून द्यायचे असल्याने प्रभागाचे क्षेत्रफळ बरेच मोठे झाले आहे. मतदारांची संख्याही ७० ते ८० हजारच्या दरम्यान आहे. इतक्या मोठ्या क्षेत्रफळात संख्यने जास्त असलेल्या मतदारांबरोबर संपर्क साधायचा तर त्यासाठी उत्सवासारखी दुसरी संधी नाही हे ओळखूनच इच्छुकांनी ही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षांच्या इच्छुकांबरोबरच स्वतंत्र लढू इच्छिणाऱ्या तसेच लहान पक्षांकडून उमेदवारीची अपेक्षा करणाऱ्या इच्छुकांचा समावेश आहे. माजी नगरसेवकही त्यामध्ये आघाडीवर आहेत. त्यांच्या अर्थशक्तीसमोर कमी पडू नये यासाठी इच्छुकांनाही कंबर कसली आहे.
यासाठी केली जाते मदत
जुन्या मूर्तीचे रंगकाम, नव्या मूर्तीची खरेदी
मंडप, सजावटीसाठीची रक्कम
विविध प्रकारच्या परवानग्या मिळवून देण्यासाठी
दररोजचा ध्वनिक्षेपक तसेच विद्युत रोषणाईच्या कमानी