पिंपरी : भोसरी येथील एका हातमोजे बनवणाऱ्या कंपनीत सर्व कर्मचारी आपल्या रोजच्या कामात होते. तितक्यात एक आकस्मिक किंकाळी घुमली. गळ्यावर धारदार हत्याराने वार करून एका तरुणीचा खून करण्यात आला. पोलिसांकडून संशयिताची शोधाशोध सुरू झाली. कोणताही पुरावा नसताना केवळ शक्यतेच्या बळावर पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले. त्याला ‘पोलिसी खाक्या’ दाखवला अन् गुन्ह्याची उकल झाली.
भोसरी येथील एक २२ वर्षीय तरुणी एका हातमोजे बनवणाऱ्या कंपनीत कापड कापण्याचे काम करायची. त्याच कंपनीत बिहार येथील २० वर्षीय तरुण कामाला होता. तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. तिच्या घरीही तो एक-दोनदा गेला होता. त्यावेळी तरुणीच्या भावाने त्याला सांगितले होते की, ‘माझ्या बहिणीचे लग्न जमलेले आहे. त्यामुळे तू तिच्याशी बोलू नकोस.’ मात्र, त्यानंतरही तिच्यावर एकतर्फी प्रेम करून तरुण संशय घेत होता.
दरम्यान, तरुणी २३ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी नऊच्या सुमारास नेहमीप्रमाणे कामावर गेली. कंपनीतील कामगार नाश्ता करत असताना एका खोलीतून तरुणीच्या किंकाळण्याचा आवाज आला. तरुणीचा खून झाला होता. तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त राम जाधव, भोसरीचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे यांनी तपासाबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे आणि त्यांच्या पथकाने तपास सरू केला. मात्र, सीसीटीव्ही नव्हते, खूप सारे कामगार आणि कोणताही प्रत्यक्षदर्शी नव्हता. त्यामुळे केवळ शक्यता पडताळून पोलिसांना कौशल्यपूर्वक तपास केला.
एकतर्फी प्रेम, संशय आणि खून
संशयित तरुण तिच्यावर प्रेम करायचा; पण तिचे त्याच्यावर प्रेम नव्हते. ती इतर मुलांशी बोलली की तो संतापायचा. संशयातूनच त्याने ठरवले, ‘जर ती माझी नाही होऊ शकत, तर कोणाचीच नाही...’
रक्ताने माखलेले कपडे खाणीत धुतले...
खून केल्यानंतर तरुण कंपनीतून पळून मोशी-दिघी येथे गेला. रक्ताने माखलेले कपडे त्याने एका खाणीतील पाण्यात धुतले. त्यानंतर तो पुणे रेल्वे स्थानकावर गेला. मात्र, बिहारकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीला उशीर असल्याने तो जिन्याच्या पायऱ्यांखाली लपून बसला.
‘तो इथे नाही… कुठे गेला?’
तरुणीसोबत काम करणारा तरुण कंपनीत दिसत नव्हता. तो कुठे आहे, याबाबत कुणालाही काही कल्पना नव्हती. त्यामुळे पोलिसांना एकच शक्यता वाटली की, ‘तो त्याच्या मूळगावी बिहार येथे जाण्याचा प्रयत्न करत असेल!’ त्यामुळे तत्काळ पथकाने पुणे रेल्वे स्थानक गाठले. तेथे १५ मिनिटे पाहणी केली असता एका जिन्याखाली तरुण लपलेला आढळला.
‘त्याच्या डोळ्यांत अपराध होताच...’
पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. तो बोलण्यास तयार नव्हता; पण अनुभव आणि कौशल्य यांच्या जोरावर पोलिसांनी त्याला बोलते केले. ‘हो, मी तिला मारलं, कारण ती माझी नव्हती...!’ असे म्हणत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
संशयित तरुणाने त्याचा मोबाइल फोन बंद केला होता. त्यामुळे तांत्रिक तपासात अडचणी होत्या. तो मूळगावी जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला. केवळ या शक्यतेवरून शोध सुरू केला आणि रेल्वे स्थानकातून त्याला ताब्यात घेतले. -महेंद्र गाढवे, पोलिस उपनिरीक्षक