नारायणगाव : जुन्नर विधानसभेचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केल्याने त्यांच्या अपात्रतेची मागणी करणारे पिटीशन ॲड. विजय कुऱ्हाडे यांनी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केले आहे. या प्रकरणी विधानसभा सचिवालयाने सोनवणे यांना दोनदा लेखी अभिप्राय मागितला असून, त्यांनी अद्याप उत्तर न दिल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शरद सोनवणे यांनी शिंदे गटात सहभाग घेतला होता. मात्र, अजित पवार यांच्या महायुतीतील सहभागामुळे जुन्नरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आणि अतुल बेनके यांना उमेदवारी मिळाली. यानंतर सोनवणे यांनी अपक्ष निवडणूक लढवून ६,६६४ मतांनी विजय मिळवला. विजयानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना खास हेलिकॉप्टरने ठाण्याला बोलावले होते. दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी नारायणगाव येथे झालेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या पक्षप्रवेशानंतर ॲड. विजय कुऱ्हाडे यांनी दि. १५ मे २०२५ रोजी सोनवणे यांच्या अपात्रतेची मागणी करणारे पिटीशन दाखल केले. विधानसभा अध्यक्षांनी दि. ११ जून २०२५ रोजी सोनवणे यांना सात दिवसांत लेखी अभिप्राय सादर करण्याचे आदेश दिले. अभिप्राय न मिळाल्याने दि. ९ जुलै २०२५ रोजी पुन्हा सात दिवसांची मुदत देण्यात आली. ही मुदतही संपुष्टात आली असून, सोनवणे यांचे उत्तर काय असेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर मी महायुतीसोबत सहयोगी सदस्य म्हणून पत्र दिलेले आहे. त्यामुळे मी महायुतीतील कोणत्याही पक्षात राहू शकतो. विधिमंडळात माझी नोंद अपक्ष आमदार म्हणून आहे. - शरद सोनवणे आमदार