- हिरा सरवदेपुणे : शहरात सगळीकडे होर्डिंगचे व फ्लेक्सचा सुळसुळाट पाहायला मिळत असताना महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाकडे शहरातील व समाविष्ट गावांमधील अनधिकृत होर्डिंगची माहितीच नाही. ज्यांनी रीतसर परवानगी घेतली आणि ज्या होर्डिंगवर कारवाई करण्यात आली, याचीच माहिती प्रशासनाकडे आहे. दरम्यान, शहरात २६३८ अधिकृत होर्डिंग असून, वर्षभरात २३६ अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केल्याची माहिती आकाशचिन्ह व परवाना विभागाने दिली आहे. तसेच होर्डिंग व फ्लेक्सच्या परवान्यातून ३१ कोटी, तर कारवाईतून दोन कोटी उत्पन्न मिळाले आहे.
महापालिका हद्दीत कोठेही होर्डिंग किंवा फ्लेक्स उभे करण्यासाठी आकाश चिन्ह व परवाना विभागाकडून सशुल्क परवानगी दिली जाते. महापालिकेने परवानगी दिलेल्या होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची व दरवर्षी परवान्याचे नूतनीकरण करण्याची जबाबदारी संबंधित होर्डिंग मालकावर असते. परवानगी दिलेल्या कालावधीनंतर संबंधितांनी सदर जाहिरात काढली नाही, तर महापालिकेकडून त्याच्यावर कारवाई केली जाते. मात्र, महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता शहरातील विविध रस्ते, चौक, पदपथ, इमारती आणि सार्वजनिक ठिकाणी
अनधिकृतपणे होर्डिंग आणि फ्लेक्स उभारले जातात. यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडते. अशा बेकायदेशीर जाहीरातबाजीवर महापालिकेकडून कारवाई केली जाते. मात्र अधिकारी, कर्मचारी आणि व्यावसायिकांचे असणारे लागेबांधे आणि त्याला मिळणारे राजकीय पाठबळ यामुळे कारवाईला लगाम लागतो. त्यामुळे शहरात अनधिकृत फ्लेक्सबाजी, जाहिरातबाजी आणि होर्डिंगचा आलेख दिवसेंदिवस वाढताच आहे. परिणामी शहराचे विद्रुपीकरण होते.
कारवाई केलेल्या होर्डिंगला प्रत्येकी ५० हजार रुपये दंड केला जातो, तर अनधिकृत फ्लेक्स व जाहिरात फलकाला प्रत्येकी एक हजार रुपये दंड केला जातो. ज्या होर्डिंग मालकांनी शुल्क भरून परवाना घेतला आहे किंवा परवान्याचे नूतनीकरण केले आहे, अशाच होर्डिंगची माहिती आकाशचिन्ह विभागाकडे आहे. तसेच कारवाई केलेल्या होर्डिंगची व फ्लेक्सची माहिती आहे, कारवाई न झालेल्या व परवानाही नसलेल्या शहरातील होर्डिंगची माहिती आकाशचिन्ह विभागाकडे नाही. ही माहिती विचारल्यानंतर केवळ कारवाईची माहिती दिली जाते. त्यामुळे या विभागाचा कारभार आंधळं दळतं आणि कुत्र पिट खातं अशी असल्याचे स्पष्ट होत आहे. रस्त्यालगतच्या होर्डिंग्ज पाहून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कारण पादचाऱ्यांना चालताना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
कारवाईचे स्वप्न हवेतचअनधिकृत होर्डिंग व फ्लेक्सबाजीमुळे होणारे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी फ्लेक्स छपाई करणान्यांसाठी काही नियमावली जारी करून त्याचा भंग करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची घोषणा महापालिकेने केली होती. मात्र त्यावर कार्यवाही झाली नाही
एका परवान्यावर अनेक होर्डिंग्जचीही माहिती नाहीएका होर्डिंगला दिलेल्या परवानगीचा वापर करून दुसऱ्या एका ठिकाणी त्याच नंबरचे होर्डिंग उभारल्याचाप्रकार दोन वर्षांपूर्वी मुंढवा परिसरात उजेडात आला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांनी शहरातील इतर होर्डिंगही या अनुषंगाने तपासणी करण्याचे जाहीर केले होते. मात्र त्यानंतर काहीच झाले नाही. त्यामुळे प्रशासनाकडे अशी माहिती नाही.आकाश चिन्ह विभागाने काय माहिती दिली शहरात २६३८ अधिकृत होर्डिंग आहेत. १ एप्रिल २०२४ ते ६ मार्च २०२५ या कालावधीत २३६ अनधिकृत होडिंगवर कारवाई केली.वर्षभरात होडिंग व फ्लेक्सच्या परवान्यातून ३१ कोटी १० लाख ८२ हजार ९८० रुपये उत्पन्न मिळाले. वर्षभरात अनधिकृत होर्डिंग व फ्लेक्ससबॅनरवरील कारवाईतून १ कोटी ९० लाख ५ हजार ५ रुपये दंड वसूल केला.वर्षभरात अनधिकृतपणे उभारलेल्या ३० होर्डिंगवर गुन्हे दाखल केले.अनधिकृत होडिंग व फ्लेक्स उभारणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी १२१ तक्रारी अर्ज पोलिस ठाण्यात दिलेत.
वारंवार होडिंग व फ्लेक्सवर कारवाई केली जाते. याशिवाय परवाना निरीक्षकांनी केलेल्या पाहणीमध्ये अनधिकृत आढळणाऱ्या होडिंग व फ्लेक्सवरही कारवाई केली जाते. अनधिकृत होर्डिंगसंदर्भात सर्व्हे करण्यासाठी एजन्सी नेमली आहे, त्या एजन्सीकडून माहिती मागण्यात आली आहे, ती लवकरच मिळेल. - प्रशांत ठोंबरे, विभागप्रमुख, आकाशचिन्ह व परवाना विभाग, महापालिका