पांडुरंग मरगजे
धनकवडी : तब्बल तीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मुहूर्त लागला असून, पुणे महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना शुक्रवारी (दि.२२) सायंकाळी जाहीर झाल्यानंतर धनकवडी बालाजीनगरसह दक्षिण उपनगरात चर्चांना उधाण आले आहे. दक्षिण उपनगरातील काही प्रभाग ‘जैसे थे’च, तर काही प्रभागांत प्रचंड उलथापालथ झाली आहे. हे प्रभाग तयार करताना राजकीय समीकरणे महत्त्वाची ठरली असून यामध्ये कोणाची भूमिका महत्त्वाची होती?, प्रभाग रचना करताना कोणाचा होल्ड होता, यावरून उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
दक्षिण उपनगरातील धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सहकारनगर, पद्मावती, धनकवडी, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, आंबेगाव, खुर्द, आंबेगाव बुद्रुक, लगतच्या वाड्या असे मिळून प्रभाग क्रमांक -३६ सहकारनगर पद्मावती, प्रभाग क्रमांक - ३७ धनकवडी कात्रज डेअरी, प्रभाग क्रमांक - ३८ आंबेगाव कात्रज असे तीन प्रभाग झाले आहेत. यामधील दोन प्रभाग चार सदस्यीय व एक प्रभाग पाच सदस्यीय झाला आहे.
ही प्रभाग रचना करताना मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप झाला असल्याचे दिसून येत असून, भाजपने बऱ्यापैकी या प्रभाग रचनेवर स्वतःचा होल्ड ठेवला आहे. पाचच्या प्रभागात शिवसेनेचा वरचष्मा, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातातून मात्र प्रभाग रचना निसटली असल्याचे वास्तव दक्षिण उपनगरातील सध्याचे चित्र पाहता निदर्शनास येत असले, तरी कोण कोणाला कात्रजचा घाट दाखविणार हे येणारा काळच ठरवेल.
हरकती सूचनांसाठी बारा दिवसांचा कालावधी असून, प्रभाग रचनेच्या प्रतीक्षेत जेवढा ताण लोकप्रतिनिधींनी घेतला तेवढीच तत्परता हरकती सूचनांसाठी दाखवावी लागणार आहे, अन्यथा ‘बैल गेला अन् झोपा केला’, अशी आपली गत होईल.
प्रभाग क्रमांक -३६ सहकारनगर पद्मावती ‘जैसे थे’च, तर प्रभाग क्रमांक - ३७ धनकवडी कात्रज डेअरीमध्ये फारसा बदल नाही. मात्र, प्रभाग क्रमांक ३८ कात्रज, आंबेगाव पाच सदस्यांचा झाला असून त्याची पंख्यासारखी रचना आणि विस्तार पाहून यामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय समीकरण बदलणार आहेत. मात्र, इतका मोठा प्रभाग झाल्यामुळे त्याचा विकासकामांवरही नकारात्मक परिणाम होणार आहे. पाच नगरसेवकांमुळे नेमकी जबाबदारी निश्चित होणार नाही.