भुलेश्वर : संपूर्ण राज्यात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले आणि शिल्पसौंदर्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून देशभरात नावलौकिक मिळवलेले श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिर श्रावणी यात्रेसाठी सज्ज झाले आहे. २५ जुलै २०२५ पासून सुरू होणारी ही यात्रा २३ ऑगस्टपर्यंत महिनाभर चालणार असून, चार सोमवारी भव्य पालखी सोहळ्यासह उत्साहात साजरी होणार आहे. यात्रेची सांगता सासवड येथील तेल्या भुत्त्याच्या मानाच्या कावड मिरवणुकीने होईल.
भुलेश्वर मंदिराशी संबंधित एक रोचक पौराणिक आख्यायिका प्रचलित आहे. असे सांगितले जाते की, हिमालयात भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यात सारीपाटाच्या खेळादरम्यान भांडण झाले. रागाने हिमालय सोडून शिवशंकर पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील भुलेश्वरी डोंगरावर तपस्येसाठी आले. माता पार्वतीने भिल्लिणीचे रूप घेऊन नृत्य करत शिवशंकरांना भुलवले; त्यामुळे या स्थानाला ‘भुलेश्वर’ हे नाव पडले. रागावलेल्या शिवशंकरांनी माता पार्वतीला तोंड न पाहण्याचा शाप दिला, यामुळे भुलेश्वर मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकवडी गावातील कुमजाई मातेचे मंदिर आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही मंदिरांमधून एकमेकांचे दर्शन होत नाही.
मंदिराचे शिल्पसौंदर्य
बाराव्या शतकात यादवराजाने बांधलेले हे मंदिर तीन घुमटांनी युक्त आहे. मंदिरातील सभामंडप, रामायण-महाभारतातील युद्धप्रसंगांचे नक्षीकाम आणि रावणाने केलेले सीताहरण यांसारखी शिल्पे भाविकांचे लक्ष वेधून घेतात. प्रदक्षिणा मार्गावर गणेशाचे श्रीरूप, मध्यभागी सुंदर शिवलिंग आणि समोरील भव्य नंदी यांचे दर्शन घडते. विशेष बाब म्हणजे, वर्षातून दोनदा सूर्याची पहिली किरणे थेट शिवलिंगावर पडतात. यासाठी नंदीची मान उजवीकडे वळवण्यात आली आहे. हे एकमेव शिवलिंग आहे, ज्याची पिंडी आणि लिंग वेगळे आहे. येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची लिंगेही आहेत. पेढे आणि दूधकेळीचा प्रसाद येथे ठेवला जातो, जो आजही ग्रामस्थांद्वारे घेतला जातो.
श्रावणी यात्रेचा उत्साह
श्रावण महिन्यातील चार सोमवारी भरणाऱ्या या यात्रेत माळशिरस येथील काळेवाड्यातून श्रीक्षेत्र भुलेश्वर देवाची मानाची पालखी मिरवणूक भुलेश्वराकडे प्रस्थान करते. भुलेश्वरी पाण्याच्या कुंडात देवाला स्नान घालून महाआरती होते. दुपारी तीन वाजता मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर धार घातली जाते. यंदा भुलेश्वर डोंगर हिरवागार झाला असून, दिवसभर महाप्रसादाचे आयोजन होणार आहे. चौथ्या सोमवारी सासवड येथील तेल्या भुत्त्याच्या कावड मिरवणुकीने यात्रेची सांगता होईल.
भाविकांसाठी आवाहन
लाखो भाविक दरवर्षी श्रावण महिन्यात भुलेश्वरच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येतात. मंदिर परिसरातील हिरवळ, शिल्पसौंदर्य आणि पौराणिक महत्त्व यांमुळे भुलेश्वर यात्रा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरते. यंदाच्या यात्रेत सहभागी होऊन या जागृत देवस्थानाचे दर्शन घेण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.