पुणे: इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याविरोधात आवाज उठवलेल्या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने आता वाद नको संवाद हवा अशा भूमिका घेतलीआहे. फक्त भूमिका घेऊनच पुण्यातील शिवसैनिक थांबले नाहीत तर त्यांनी हिंदी भाषिकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणाचे वर्ग आयोजित करण्यात पुढाकार घेतला आहे. जैन राष्ट्रीय सेनेने यासाठी त्यांना सहकार्य केले आहे.
या सेनेचे शिवसेनेला मराठी प्रशिक्षणासाठी होत असलेले हे सहकार्य शिवसेनेने शहरात विविध ठिकाणी फलकांच्या साह्याने जाहीर केले आहे. पोपट ओसवाल हे जैन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांचे ते मित्र. गप्पा मारता मारता ओसवाल यांनी मारहाण करणे काही योग्य नाही, त्यापेक्षा त्यांना मराठी बोलायला शिकवायला हवे अशी भूमिका व्यक्त केली.
मोरे यांनी त्यासाठी लगेच सहकार्याचा हात पुढे केला. त्यातूनच ही मराठी भाषा प्रशिक्षण वर्गाची कल्पना पुढे आली. परराज्यातून पुण्यात व्यवसाय, उद्योग, नोकरी यासाठी आलेल्यांना या वर्गात मराठी भाषा शिकवली जाईल. त्यासाठी खास शिक्षक नियुक्त केले जाणार आहे. ओसवाल यांनी सांगितले की त्यांना काही मराठी भाषेची परिक्षा द्यायची नाही, दैनंदिन उपयोगातील, व्यवसाय करताना ग्राहकांबरोबर बोलता येण्यापुरती मराठी त्यांना विनामुल्य शिकवली जाईल.
मोरे म्हणाले, “पोट भरण्यासाठी आलेल्यांबरोबर वाद करण्यात आम्हालाही काही स्वारस्य नाही, मात्र कोणी दांडगाई करत असेल, मराठीला नाव ठेवत असेल तर आम्ही ऐकणार नाही. पण कोणाला मराठी भाषा शिकून घ्यायची असेल तर त्यासाठी आमची तयारी आहे. यासाठी आम्ही मराठी भाषेच्या प्रसारासाठी काम करणाऱ्या अनेकांबरोबर बोललो आहोत. त्यांनीही आम्हाला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. रोजच्या वापरापूरते मराठी त्यांना यावे एवढीच आमची अपेक्षा आहे. तरीही कोणाला आणखी पुढे शिकायचे असेल तर आनंदच आहे.”