नीरा : सातारा-पुणे दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सकाळी सव्वासहा वाजता साताऱ्यातून पुण्याकडे जाणारी डेमू लोकल ट्रेन सलग चार दिवस बंद असल्याने नोकरदार व पुणे येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले आहेत. पासधारक विद्यार्थ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसून शाळा महाविद्यालय गाठावे लागत आहे.
गेल्या २ वर्षांपासून काही ना काही कारणाने सातारा-पुणे गाडी नं. ७१४२६ व पुणे-सातारा गाडी नं. ७१४२५ डेमू लोकल ट्रेन अनियमितपणे सोडण्यात येते. कधी उशिरा, तर कधी अचानक ती रद्द करण्यात येते. यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. सातारा, वाठार, लोणंद, नीरा, जेजुरी यांसह तेरा स्थानकांवरून पुणे शहरात नोकरी, धंद्यानिमित्त व महाविद्यालयीन शिक्षणासाठी विद्यार्थी पास काढून प्रवास करत असतात. तसेच संध्याकाळी सहाच्या दरम्यान पुन्हा माघारी येण्यासाठी पुणे-सातारा डेमू लोकल आहे. ही लोकल अनियमित धावत असते. अचानक ही गाडी तास दोन तास उशिरा येते. यामुळे घरी पोहोचण्यास विद्यार्थ्यांना व नोकरदारांना उशीर होतो.
तक्रारीची दखल नाही
या गाड्या नियमित वेळेत सोडाव्यात व पुणे स्थानकात वेळेत घ्याव्यात यासाठी प्रवाशांनी वारंवार लेखी तक्रारी केल्या आहेत व रेल्वेच्या ॲपवर आपल्या तक्रारी नोंदवल्या आहेत. मात्र, या तक्रारींची कोणतीही दखल रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येत नाही.
सातारा-पुणे गाडी नं. ७१४२६ व पुणे-सातारा गाडी नं. ७१४२५ डेमू लोकल ट्रेन दि. १६ ते दि. १९ दरम्यान गेले चार दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. या रेल्वे मार्गावर दौंडज रेल्वे स्टेशनमध्ये काम सुरू असल्याचे सांगितले जाते, पण या मार्गावरील इतर सर्व गाड्या नियमित धावतात. अगदी मालवाहतुकीच्या गाड्याही याच वेळेत सुसाट जातात. मग जास्त प्रवासी संख्या असलेली ही डेमू लोकल का रद्द करण्यात येते? असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.
सातारा, वाठार, लोणंद, नीरा व जेजुरी येथील नियमित प्रवासी या लोकल ट्रेनच्या अनियमित वेळेला पुरते वैतागले आहेत. रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांना व राजकीय पुढाऱ्यांना कित्येक वेळा लेखी अर्ज करूनही कोणताही बदल रेल्वे प्रशासनाकडून होत नसल्याने. तसेच कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने आता रेल्वे पासधारक रेल्वे प्रवाशांकडे आंदोलना शिवाय दुसरा पर्याय नाही - प्रशांत धुमाळ : पासधारक रेल्वे प्रवासी