कात्रज : डोंगर रांगा व निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या दक्षिण पुण्यातील डोंगररांगा व आजुबाजूला असणाऱ्या मांगडेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी कोळेवाडी भागात सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करून टेकडीफोड करून अनधिकृतपणे प्लॉटिंग केले जात आहे. एकीकडे पावसाळा सुरू असून डोंगर भागांमधून मोठ्या प्रमाणात पाणी खाली येत असते. यामुळे डोंगर खचण्याच्यादेखील दुर्घटना घडू शकतात. असे असताना देखील या समाविष्ट गावांमधील बऱ्याच ठिकाणी धोकादायक पद्धतीने टेकडीफोड सुरू असून, अनधिकृत गोडाऊन उभारून व्यवसायदेखील थाटले जात आहेत.नैसर्गिक डोंगररांगांचा ऱ्हास करून कृत्रिम सिमेंटची जंगले उभी केली जात आहेत, तसेच बेकायदा उत्खनन करून अनधिकृत गोडाऊन व इमारती उभ्या केल्या जात आहेत. दुसरीकडे गोरगरीब नागरिकांचीदेखील फसवणूक केली जात आहे. असे असतानाही महसूल विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. या अगोदरदेखील पुणे जिल्ह्यामध्ये दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या असून, यामध्ये अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. त्याचबरोबर अनधिकृत गोडाऊनलादेखील आग लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत.
या भागात डोंगर व टेकड्यांचा पायथा तर सोडाच पण डोंगरमाथा गिळंकृत करून पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे.रोजरोसपणे बेकायदा उत्खनन करून अनधिकृत प्लॉटिंग केले जात आहे. डोंगर पोखरत असताना अत्यंत धोकादायक पद्धतीने शंभर-दीडशे फुट उत्खनन करून बेकायदा प्लॉटिंग, गोडाऊन आणि बांधकामे होत आहेत. डोंगरांना पूर्णपणे वेधले आहे. कात्रज घाट परिसरात पर्जन्याचे प्रमाण अधिक असल्याने डोंगर माथ्यावरील उत्खननामुळे पाणी मुरून दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर उत्खनन बंद, नंतर पुन्हा सुरूयापूर्वी लोकमतमध्ये वृत्त आल्यावर अनधिकृत उत्खननावर काही ठिकाणी महसूल विभागाने पंचनामे करून दंडात्मक कारवाई केली. परंतु पुन्हा 'जैसे थी'च स्थिती पाहायला मिळत आहे. पुन्हा दक्षिण पुण्यातील बऱ्याच ठिकाणी अनधिकृतपणे गोडाऊन उभारून भाड्याने दिली जात आहेत. ज्याकडे दुर्लक्ष केले जात असून, तेथे अनधिकृत उत्खनन करून इमारती बांधल्या जात आहेत.
दक्षिण पुण्यातील बऱ्याचशा भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत उत्खनन व अनधिकृ प्लॉटिंग सुरू आहेत. यापूर्वी माळीणसारख्या दुर्घटना घडल्या असून, कोणालाही याचे गांभीर्य दिसून येत नाही. निसर्गाचा हास होत असून मानवी वस्तीलादेखील याचा धोका आहे. त्यामुळे याची योग्य ती दखल घेण्यात यावी. - सदानंद कांबळे, पर्यावरणप्रेमी
जर अशा पद्धतीने धोकादायक उत्खनन केले जात असेल तसेच अशा ठिकाणी गोडाऊन व बांधकाम होत असतील तर ताबडतोब त्या ठिकाणची पाहणी करण्यात येईल तसेच अशा ठिकाणी पाहणी करण्याच्या देखील सूचना दिल्या आहेत. उत्खननाच्या दंडात्मक वसुलीबाबत कार्यवाही नियमानुसार केली जाईल. - किरण सुरवसे, तहसीलदार हवेली