पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आगामी येत्या दोन ते तीन दिवसांत प्रारूप प्रभाग रचनेचे काम संपणार असून, त्यानंतर मसुद्यावर २५ ते ३१ जुलैदरम्यान समिती सदस्यांच्या सह्या होणार आहे. त्यानंतर महापालिका प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा ४ ऑगस्ट रोजी नगरविकास विभागाला सादर केला जाणार आहे.
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नगरविकास विभागाने नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काम सुरू आहे. पुणे महापालिकेमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार शहरात १६५ नगरसेवक असतील. यानुसार सध्या निवडणूक कार्यालयाकडून गुगल मॅपिंगचा वापर करून प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. २३ ते २४ जुलैपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल. यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन प्रभागांच्या सीमारेषांची पाहणी करण्यात येईल. यानंतर हे प्रारूप महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात येईल. महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीने अंतिम झालेले प्रारूप चार ऑगस्टपर्यंत नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. हा प्रारूप आराखडा नगरविकास विभाग ६ ते ११ ऑगस्टदरम्यान राज्य निवडणूक आयोगास सादर करणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून २२ ते २८ ऑगस्ट दरम्यान प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यासाठी पालिकेस पाठवणार आहे. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सुनावणी मागविण्यात येणार आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या समावेशाचा प्रभाग रचनेवर परिणाम नाही
पालिकेच्या हद्दीतील पुणे, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पालिकेत समावेश करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. मात्र, समावेशाचा निर्णय अद्याप झालेला नाही. विलीनीकरण झालेले नसल्याने कॅन्टोन्मेंटचा पालिकेच्या प्रभाग रचनेवर कोणताही परिणाम होणार नाही. राज्य सरकारने पुणे महापालिकेच्या हद्दवाढीचा अध्यादेश काढलेला नाही. त्यामुळे प्रभाग, नगरसेवकांची संख्या वाढण्याच्या चर्चेला प्रशासनाने तूर्तास पूर्णविराम दिला आहे.