पुणे : बंडगार्डन रस्त्यावरील ताराबाग येथील तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या शोरूम व सर्व्हिस सेंटरमध्ये ( दि २ ५ ) रात्री ८.३८ वाजता भीषण आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली.अधिकच्या माहितीनुसार, नायडू व येरवडा अग्निशमन केंद्रातील पथक तसेच मुख्यालयातील एक वॉटर टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाहिले असता तळमजल्यावर मोठ्या प्रमाणात आग लागून दुचाकी पेटल्यामुळे प्रचंड धूर पसरला होता. तपासादरम्यान एक व्यक्ती धुरामुळे अडकलेली असल्याचे समजले. अग्निशमन जवानांनी त्याला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर पाण्याचा मारा करून आग विझविण्याचे काम हाती घेण्यात आले.तीव्र धूरामुळे जवानांनी श्वसनयंत्र परिधान करून जवळपास अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले. या आगीत इलेक्ट्रिक व पेट्रोल अशा सुमारे ६० दुचाकी जळून खाक झाल्या असून काही नवीन तसेच दुरुस्तीकरिता आलेल्या गाड्यांचा समावेश होता.
याशिवाय इलेक्ट्रिक वायरिंग, यंत्रसामग्री, बॅटरी, वाहनांचे सुटे भाग, संगणक, सोफा, एसी, टेबल-खुर्च्या आणि महत्त्वाची कागदपत्रेही जळून खाक झाली आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी वेळेत कार्यवाही करून पुढील मोठा धोका टाळला. या कामगिरीत महावितरण कर्मचारी व पोलिसांचा देखील सहभाग होता.