ओतूर : जुन्नर तालुक्यातील रोजी अंदाजे पहाटे ४:३० वाजेदरम्यान ओतूरमधील बाबीतमळामध्ये बिबट नर अंदाजे वय पाच ते सहा वर्षे अडकला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
अधिक माहिती अशी की, मोठ्या प्रमाणात उत्तर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांच्या मागणीनुसार बाबीतमळा येथे पिंजरा लावण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी, दि. २४ मार्च रोजी पहाटे ४:३० वाजेच्या दरम्यान तुकाराम गिते यांच्या भ्रमणध्वनीवरून वनविभागाला बिबट्या जेरबंद झाला आहे, अशी माहिती समजताच तत्काळ वनपाल ओतूर सारिका बुट्टे, वनरक्षक विश्वनाथ बेले, दादाभाऊ साबळे मोहिनी वाघचौरे, तसेच किसन केदार, गंगाराम जाधव, गणपत केदार, फुलचंद खंडागळे, रोहित लांडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून घटनेची खात्री केली.
वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर लहू ठोकळ यांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी सर्व वनकर्मचारी, आपदा मित्र वैभव अस्वार, विराज अस्वार, तसेच ग्रामस्थ तुकाराम गिते, गणेश गिते, संस्कार गिते, विकास गिते, कुणाल गिते, पोपट मालकर, प्रदीप तांबे, सुनील मोरे यांच्या मदतीने पिंजऱ्याच्या साहाय्याने सदर बिबट यास योग्य त्या पद्धतीने रेस्क्यू करून त्याला सुखरूप माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे दाखल करण्यात आले.