पुणे : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शालेय वाहतूक करणाऱ्या बस आणि व्हॅनमध्ये ३१ जुलैपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, अन्यथा संबंधित बस, व्हॅन मालक व चालकांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश प्रादेशिक परिवहन विभागाकडून काढण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व स्कूलबस चालकांना सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे.
पुणे शहर व परिसरात जवळपास ७ हजार १०३ स्कूलबस व व्हॅनमधून विद्यार्थी वाहतूक करण्यात येते. त्यातील काही ठरावीक स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. त्यातही काही बसमधील सीसीटीव्ही बंद आहेत. व्हॅनमध्ये सीसीटीव्ही बसविल्याचे निदर्शनास येत नाही. त्यामुळे मागील वर्षभरात स्कूल व्हॅनसह बसमध्ये शालेय विद्यार्थी, लहान मुलांबरोबर घडलेल्या प्रकरणातून पुणे पोलिस आणि परिवहन विभागाकडून शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने सर्व स्कूल बस आणि व्हॅनमध्ये सीसीटीव्ही बसविणे बंधनकारक करण्याचे आदेश दिले. नुकत्याच झालेल्या शालेय बस सुरक्षितता समितीच्या बैठकीतील सीसीटीव्ही बसविण्याबरोबरच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.सध्या शाळा सुरू झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू झाली. संबंधित शाळा व्यवस्थापनासह वाहन मालक यांनी दक्षता घ्यावी. तसेच शाळा व्यवस्थापन व शालेय परिवहन समिती/विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती यांनी स्कूल बस नियमावली व नवीन अटी शर्तीचे पालन होत आहे, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.
हे आहेत नियम :
- शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी बस व अन्य वाहनांनी सीसीटीव्ही बसवावेत.
- सहा वर्षांखालील मुलांना ने-आण करण्यासाठी महिला कर्मचारी नियुक्ती करावी.
- मुली असणाऱ्या शाळेतील वाहनांमध्ये महिला कर्मचारी बंधनकारक आहे.
- चालक, वाहक, क्लीनर यांची पोलिस चारित्र्य पडताळणी करावी.
- क्षमतेपेक्षा जास्त शालेय विद्यार्थी वाहतूक करू नये.
शालेय वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांनी ३१ जुलैपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे. एक ऑगस्टनंतर स्कूल बस नियमावलीचे पालन होत आहे का? सीसीटीव्ही कॅमेरे बसविले का? याची तपासणी करून दोषी वाहनांवर कडक कारवाई करण्यात येइल. - स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे