लष्कर : पब, क्लबमध्ये होत असलेल्या कॉलेजच्या फ्रेशर्स पार्ट्या बंद करण्यात आल्या असून,आता पबमध्ये प्रवेश करण्यासाठी डीजी लॉकर ओळखपत्र पडताळूनच प्रवेश देण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढले आहेत. राजा रावबहादूर मिल्स येथील कीकी पबमध्ये मनविसेने आंदोलन करून फ्रेशर्स पार्टी बंद पाडली होती, त्या आंदोलनानंतर आता पोलिस अॅक्शन मोडवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.पुणे शहरात विविध पब, क्लब आणि रेस्टॉरंट्समध्ये होत असलेल्या फ्रेशर्स पार्टी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आंदोलन केले होते. पुण्याची बदलत चाललेली संस्कृती ही धोकादायक अवस्थेत आहे. पुण्यात सर्रास होत असलेल्या अशा पार्ट्यांमुळे पोर्शे प्रकरण घडले होते. दोन जीव गेल्यानंतर तरी पोलिसांनी पब्जने नियम अधिक कडक करावे, अशी मागणी मनसेने केली होती.
याबाबत मनसैनिकांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले असल्याची माहिती शहराध्यक्ष धनंजय दळवी यांनी दिली. यावेळी यांच्यासह महा. राज्य प्र संघटक मा. प्रशांत कनोजिया, राज्य सचिव आशिष साबळे, राज्य उपाध्यक्ष सचिन पवार, राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक थिटे, रूपेश घोलप, शहर उपाध्यक्ष विक्रांत भिलारे, विभाग अध्यक्ष हेमंत बोळगे, आशुतोष माने, केतन डोंगरे, संतोष वरे, नीलेश जोरी, सचिव मयूर शेवाळे, अक्षय पायगुडे, आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्य उत्पादन शुल्क विभाग करतो काय ?राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बार, पब्ज यांना मद्यविक्रीचा परवाना दिला जातो, मात्र १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मद्यविक्री केली जात असेल तर त्यांचा मद्यविक्रीचा परवाना रद्द करण्याचा अधिकार उत्पादन शुल्क विभागाकडे आहे. मात्र, त्यांच्याकडूनही 'अर्थपूर्ण'रीत्या हा प्रकार सुरू आहे. याबाबत भरारी पथकही काही कारवाई करीत नाही अशी तक्रार दाखल करण्यात आली.