पुणे : लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेत अधिकारी असल्याची बतावणी करून एका व्यावसायिकाची ४ कोटी ६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पर्वती पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
शुभम सुनील प्रभाळे (वय ३१), सुनील बबनराव प्रभाळे, भाग्यश्री सुनील प्रभाळे, ओंकार सुनील प्रभाळे, प्रशांत राजेंद्र प्रभाळे (सर्व रा. छत्रपती संभाजीनगर, धनकवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात पर्वती येथील एका व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी व्यावसायिक एकमेकांचे ओळखीचे आहेत.
शुभम प्रभाळेने लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेत अधिकारी असल्याची बतावणी करत गुप्तचर यंत्रणेकडून ३८ कोटी रुपये मिळणार आहेत, अशी बतावणी केली. ही रक्कम मिळवण्यासाठी सुरुवातीला काही शुल्क भरावे लागणार आहे, असे सांगत फिर्यादीकडून वेळोवेळी ४ कोटी ६ लाख ७ हजार रुपये उकळले. त्याने ही रक्कम फिर्यादीकडून ऑनलाइन, तसेच रोख स्वरूपात घेतली. त्यानंतर आरोपींनी त्यांना रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी पर्वती पोलिसात तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.