पुणे : थायलंडमधील फुकेत शहरातील लॉर्ड श्रीमंत गणपती देवालय स्थापनेनंतर पहिल्यांदा गणेशोत्सव साजरा करत आहे. यामुळे भाविकांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे. ढोलताशांच्या गजरात बाप्पा विराजमान झाले आहे. लॉर्ड श्रीमंत देवालय स्व पहिल गणेशोत्स करत थायलंडच्या उद्योजिका व फुकेत ९ रिअल इस्टेट कंपनीच्या चेअरमन पापाचस्रोम मीपा यांनी त्यांच्या इच्छा व भक्तीमधून करोडो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची फुकेतमध्ये प्रतिकृती तयार करून त्यामध्ये दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना डिसेंबरमध्ये केली होती.
हे मंदिर जानेवारीपासून भक्तांसाठी खुले करण्यात आले. देवालयाला आकर्षक सजावट करण्यात आली असून, पुण्याचे सुभाष सरपाले यांच्या कल्पनेतून ही सजावट केली आहे. बुधवारी (दि. २७) श्री गणेशाच्या उत्सव मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनाने सोहळ्याला सुरुवात झाली आहे. गुरुवारी (दि.२८) महिलांचे सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण होणार असून, विशेष अभिषेक करण्यात येईल. सायंकाळी सिद्धार्थ जाधव, श्रुती मराठे, सौरभ गोखले, प्रसाद सुर्वे वादन करणार आहेत. तिसऱ्या दिवशी पुण्याच्या शिवमुद्रा ढोलताशा पथकाचेही वादन होणार असून, मुख्य आकर्षण ठरणार आहे.
बाप्पाला छप्पन भोगांचा प्रसाद अर्पण करण्यात येणार आहे. रविवारी (दि. ३१) सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत अभिषेक पूजन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ ते ७ दरम्यान गणेश विसर्जन सोहळा पार पडणार आहे. विसर्जन मिरवणुकीत इंदूरचे प्रसिद्ध हनुमान ढोल पथक उपस्थित राहणार आहे. उत्सव काळात रोज सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार असून, सकाळी ८, दुपारी १.३०, संध्याकाळी ३ व रात्री ८ वाजता नियोजित आरती होईल, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त चेतन लोढा यांनी दिली.