पुणे : “बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली होती. त्यानंतर त्यांनी सातत्याने आमची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जात आहोत, त्याचा प्रत्यय यातून येत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या मनधरणीनंतर माघार घेण्यात आली असून आम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा दिलेला नाही, उलट राष्ट्रवादी भाजपसोबत गेल्याचा निषेधच आहे,” अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडली.
पुणे दौऱ्यावर आले असताना सपकाळ पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराची माघार ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या फोननंतर घेण्यात आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) सर्वच नेत्यांनी यासंदर्भात गळ घातली होती. त्यामुळे सहानुभूती म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र, या राष्ट्रवादीच्या विरोधातील भूमिका बदललेली नाही. राष्ट्रवादीला कदापिही पाठिंबा दिलेला नाही. उलटपक्षी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत गेल्याचा निषेधच आहे.”
पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसने ही जागा लढण्याचे ठरविल्याने महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली. त्यानंतर त्यांनी माघारीसाठी सातत्याने आमची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जात असल्याचे हा प्रत्ययच आहे. आम्ही आमची भूमिका बदललेली नाही. यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आमच्याशी संपर्क साधला. तसेच त्यांनी नवी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट देखील घेतली. खर्गे यांनी हा निर्णय राज्य पातळीवरच घेतला जाईल, असे स्पष्ट केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुन्हा आमच्याशी चर्चा केली. त्यानंतर राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून एकवाक्यता झाल्यानंतरच काँग्रेसच्या उमेदवाराची माघार घेण्याचा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण सपकाळ यांनी यावेळी दिले.
नवीन ७ हजार चेहरे
काँग्रेस पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करत असून ‘संघटन सृजन’ या प्रक्रियेअंतर्गत राज्यात ७,५०० नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये बहुतांश नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी माहिती सपकाळ यांनी दिली. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या प्रशिक्षणाचे कार्यक्रमही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत सपकाळ म्हणाले, “केंद्रीय निवडणूक आयोग हा एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे वागत आहे. महाराष्ट्र आणि बंगालमध्ये ज्या पद्धतीने आयोग काम करत आहे, ते पाहता मतचोरीचा मुद्दा आम्ही पुन्हा एकदा ‘एसआयआर’च्या माध्यमातून लावून धरणार आहोत.”
Web Summary : Congress withdrew from Baramati by-election after NCP leaders pleaded, says Harshvardhan Sapkal. He denies supporting NCP, protesting their alliance with BJP. Congress plans organizational changes and accuses Election Commission of bias.
Web Summary : हर्षवर्धन सपकाल का कहना है कि राकांपा नेताओं के आग्रह पर कांग्रेस बारामती उपचुनाव से हट गई। उन्होंने राकांपा का समर्थन करने से इनकार किया, भाजपा के साथ उनके गठबंधन का विरोध किया। कांग्रेस संगठनात्मक बदलाव की योजना बना रही है और चुनाव आयोग पर पक्षपात का आरोप लगा रही है।