पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुण्याच्या विकासकामांकडे बारकाईने लक्ष आहे. विधानसभा अधिवेशनात पुण्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्याकडे त्यांचा कल दिसून आला. त्यावरून हे सांगता येते असे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.
अधिवेशनातील कामाकाजाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार शिरोळे यांनी असे मत व्यक्त केले. पुण्यातील सीसीटीव्हीबाबत काही प्रश्न उपस्थित केले. त्याची त्वरित दखल घेत मुख्यमंत्र्यांनी याबाबत धोरण आखण्याचे आश्वासन दिले. त्याशिवायही त्यांनी पुण्यातील अनेक गोष्टींबाबत आस्था दाखवत त्यात लक्ष घातले. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे या पंचवार्षिकमधील पहिल्या वर्षात मोठी पायाभूत विकासकामे करण्यासाठी आग्रही असल्याचे शिरोळे यांनी सांगितले.खडकी कॅन्टोन्मेंट विलीनीकरणाबाबत लवकरच संरक्षण विभाग, राज्य सरकार अशी संयुक्त बैठक होणार आहे. शिवाजीनगर बसस्थानकाबाबत महामेट्रोने परिवहनमंत्र्यांकडे एका आराखड्याचे सादरीकरण केले आहे, त्यात त्यांनी सुचवलेल्या काही दुरुस्त्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कामासाठी १ मेचा मुहूर्त दिला आहे, त्याप्रमाणे होईल अशी माहिती शिरोळे यांनी दिली.
विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल होणार खुलासावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामधील ब्रेमेन चौक ते ई-स्क्वेअरदरम्यानच्या दुहेरी उड्डाणपुलाची एक बाजू एक मे रोजी वाहतुकीसाठी खुला होईल, असे शिरोळे यांनी जाहीर केले. भारतीय जनता पक्षाचे दत्तात्रय खाडे, गणेश बागडे, रवींद्र साळेगावकर, सुनील पांडे, आनंद छाजेड, किरण ओरसे, सचिन वाडेकर, प्रकाश सोळंकी व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.