पुणे : भटक्या श्वानांच्या वाढत्या उपद्रवाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा महापालिकेने सविस्तर अभ्यास करून शहरातील भटक्या श्वानांवर कारवाई करून सर्वसामान्य पुणेकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली आहे.
शहर आणि उपनगरांच्या परिसरात भटक्या श्वानांचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात होतो. यामध्ये प्रामुख्याने रात्रीच्या वेळेस झुंडीने फिरणाऱ्या भटक्या श्वानांकडून दुचाकीस्वारांसह पायी चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचे व त्यांच्यावर हल्ले करण्याचे प्रकार वारंवार घडतात.
विशेषत: पहाटे फिरायला घराबाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही कुत्र्यांमुळे रस्त्यावर फिरणे कठीण होत आहे. त्यामुळे महापालिकेने सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार कारवाई करावी, तसेच जे प्राणी मित्र भटक्या श्वानांवर दया दाखवून त्यांना सर्रासपणे रस्त्यावर खाऊ घालतात, अशा प्राणी मित्रांवरदेखील दंडात्मक कारवाई करावी, असे निवेदन खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिले आहे.