पुणे : सरकारी यंत्रणांच्या मदतीने देशातील लोकशाही संपवण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. काँग्रेसचा लढा देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आहे. हा लढा कठीण आहे. त्यासाठी आपण सगळेच राहुल गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू व हा लढा जिंकू, असे काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना सांगितले.
पक्षाने प्रदेश कार्यकारिणीसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, नसीम खान, माजी मंत्री डॉ. नितीन राऊन, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, डॉ. विश्वजित कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष पवन खेरा, तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
चेन्नीथला म्हणाले, “राहुल गांधी चीनबद्दल काही बोलले तर न्यायाधीश त्यावर टिपणी करतात. सरकारच्या विरोधात कोणी काही बोलले तर लगेचच त्याला देशद्रोही ठरवले जाते. निवडणूक आयोगाने मतांची चोरी केल्याचे पुरावे दाखवून सांगितले तर त्याला उत्तर आयोग नाही, तर भाजपकडून दिले जाते. हे सगळे लोकशाही संपवण्याचेच प्रकार आहेत. त्याविरोधात समर्थपणे लढण्याची गरज आहे.”
देश कठीण स्थितीतून जात आहे, असे मत व्यक्त करून चेन्नीथला यांनी सांगितले की, एकाही शेजारी देशाशी आपले संबंध चांगले नाहीत. अमेरिका आपल्याला धमकी देत आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना असे धाडस कोणीही केले नाही. पक्ष पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यात मशाल मोर्चे काढावेत, नागरिकांमध्ये जा, पक्षाचे संघटन मजबूत करा, असे आवाहन चेन्नीथला यांनी केले.
दोन दिवसांची कार्यशाळा संपली. आता इथे जे काही मिळाले आहे ते थेट जनतेत जाऊन जनतेला समजावून सांगा. आपला प्रत्येक कार्यकर्ता हा प्रदेशाध्यक्षच आहे, असे प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले. विजय वडेट्टीवार यांनीही तुम्ही आमची लढाई लढलात, आता आम्ही तुमची लढाई लढतो. स्थानिक स्वराज्य संस्था जोरात लढा, संपूर्ण पक्ष तुमच्याबरोबर आहे, असे सांगितले. पवन खेरा यांनी काँग्रेसने नेहमीच संविधान व लोकशाहीचा रस्ता निवडला आहे, भाजप हा फक्त खोटी वातावरणनिर्मिती करत आहे, अशी टीका केली. माजी मंत्री अमित देशमुख यांचेही भाषण झाले.