पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना विदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख प्रत्यक्ष करून देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र, या योजनेच्या नावाखाली पैसे भरण्याची मागणी होत असल्याचे प्रकार उघड झाले आहेत. समाज माध्यमांवरून अशा प्रकारच्या पोस्ट पसरवल्या जात आहेत. मात्र, कृषी विभागाकडून या दौऱ्यासाठी अद्याप नावेच अंतिम झालेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा प्रवासी कंपनीकडे पैसे भरू नयेत, असे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना विदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख प्रत्यक्ष करून देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत इच्छुक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला अर्ज सादर केले आहेत. त्यानुसार जिल्हास्तरावर सोडत प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांची निवड अंतिम करण्यात आली असून, जिल्हास्तरावर शेतकऱ्यांची निवड झाल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत ही नावे आयुक्तालयाला ८ ऑगस्टपर्यंत देण्यात येणार आहेत. त्यानंतर राज्यस्तरावर १७० शेतकऱ्यांची नावे अंतिम करून संबंधित शेतकऱ्यांना निवड झाल्याबाबत अवगत करण्यात येईल.
शेतकरी निवड झाल्यानंतर कृषी आयुक्तालयामार्फत दौऱ्यांचे आयोजन होणार आहे. या योजनेत प्रति शेतकरी अनुदान हे एकूण दौरा खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत-जास्त एक लाख रुपये एवढे दिले जाते. त्यानुसार निवड झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत सूचना मिळाल्यानंतरच शासकीय अनुदानाची रक्कम वगळून इतर रक्कम दौरा खर्च म्हणून भरणा करायची असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी कोणत्याही व्यक्तीला, संस्थेला किंवा प्रवास कंपनीला देण्याची गरज नसल्याचेही कृषी संचालक रफीक नाईकवाडी यांनी स्पष्ट केले.