यवत (जि. पुणे) - यवतमध्ये सकाळी एका तरूणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला यवत पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. मात्र काही वेळातच संतप्त झालेल्या जमावाने वाहनांची तोडफाड व जाळपोळ केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.दौंड तालुक्यातील यवत गावात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर यवतचा आठवडे बाजार दुपारी बारानंतर बंद करण्यात आला आहे. गेल्या आठवडा भरापासून यवतमधील वातावरण तणावग्रस्त आहे. त्यातच आज सकाळी एका तरूणाने आक्षेपहार्य पोस्ट केल्यामुळे त्यात आणखी भर पडली. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला यवत पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे संभाव्य अनर्थ टळला असला तरी गावात तणावाचे वातावरण आहे. सध्या गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पुढील अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासन सतर्क आहे.या घटनेची दखल घेत स्थानिक पोलिसांनी सोशल मीडियावर सतत नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. यवत पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, दोन्ही समाजातील प्रतिनिधींशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गावातील नागरिकांना शांतता व संयम राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, यवतसह परिसरात सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारचा चिथावणीखोर मजकूर पोस्ट केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
यवतमध्ये आक्षेपार्ह पोस्टनंतर जाळपोळ;पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 15:05 IST