पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी बनवलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर हरकती आणि सूचनांच्या सुनावणीवेळी भौगौलिक आणि नैसगिक सीमा रेषा आणि अनुसूचित जातीचे (एससी) आरक्षण बदलण्यासाठी सोयीस्करपणे लोकसंख्येचे विभाजन केले गेले यावरून हरकत घेतलेले नागरिक आक्रमक झाले.
प्रभाग क्रमांक २४ कमला नेहरू हॉस्पिटल-रास्ता पेठवरील सुनावणीच्या वेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करा अशा घोषणा दिल्या. या भागात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या नागरिकांवर जाणीवपूर्वक अन्याय झाला आहे. भौगोलिक सलगतेची मोडतोड करत विशेषतः अनुसूचित जातींची लोकसंख्या असलेले भाग मुद्दाम वगळले गेले आहेत. यामुळे सामाजिक न्याय धोक्यात आला असून, आरक्षणाचा उद्देशच हाणून पाडला आहे असे हरकतधारकांनी सुनावणीच्या वेळी ठामपणे सांगितले.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १६५ असून, ४१ प्रभाग आहेत. त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय, तर ३८ क्रमांकाचा आंबेगाव-कात्रज प्रभाग पाच सदस्यीय आहे. या प्रारूप रचनेवर आलेल्या ५ हजार ९२२ हरकती आणि सूचना आल्या आहेत. या हरकती सूचनांवर राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्यापुढे आज सकाळपासून सुनावणी सुरू झाली. यावेळी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त प्रसाद काटकर,
प्रशांत ठोंबरे उपस्थित होते. त्यात पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १ ते २९ मध्ये आलेल्या हरकतींची सुनावणी झाली. त्यात सर्वाधिक हरकती प्रभागाच्या नैसर्गिक सीमारेषा आणि अनुकूल असलेला भाग जोडावा, प्रतिकूल असलेला भाग काढून टाकावा, गल्ल्यांऐवजी मुख्य रस्त्यांवरून प्रभागाची सीमा निश्चित करावी या हरकतीची संख्या सर्वाधिक होती.
भाजपवर केला आरोप, मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करा
प्रभाग क्र. २४ कमला नेहरू हॉस्पिटल-रास्ता पेठ या प्रभागाच्या प्रारून रचनेवरील हरकती आणि सुनावणीसाठी हरकतधारकांनी यावे असे स्पीकरवरून पुकारण्यात आले. त्यावर हरकती नोंदविण्यासाठी आलेले सुमारे ८५ हून अधिक जण व्यासपीठावर आले. त्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करावे असे सांगतानाच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’ या घोषणांनी बालगंधर्व रंगमंदिर दणाणून सोडले. त्यात भाजपच्या एका नेत्याने स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी सोयीस्कररीत्या लोकसंख्येचे विभाजन केले आहे. नव्या रचनेत अनुसूचित जाती प्रवर्गाच्या नागरिकांवर जाणीवपूर्वक अन्याय झाला आहे.
प्रभागाची भौगोलिक सलगता मोडून टाकून व विशेषतः अनुसूचित जातींची लोकसंख्या असलेले भाग मुद्दाम वगळले गेले आहेत. यामुळे सामाजिक न्याय धोक्यात आला असून, आरक्षणाचा उद्देशच हाणून पाडला आहे. मंगळवार पेठ, गाडीतळ, जुना बाजार, भीमनगर परिसरात, पारंपरिक अनुसूचित जातीचे आरक्षण, अनुक्रमे गेल्या ५० वर्षांपासून लागू पडत आहे. मागील निवडणुकांमध्ये प्रभाग क्र. १६ मध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या अंदाजे १४ हजार होती. नव्या प्रारून रचनेत ती मुद्दाम कमी करून केवळ ८ हजार ०४७ करण्यात आली आहे. हे जाणीवपूर्वक अनुसूचित जाती प्रवर्गाला प्रतिनिधित्व नाकारण्याचा प्रयत्न असल्याची हरकत सर्वपक्षांच्या कार्यकर्त्यांनी केली.
२ हजार ९२० पैकी फक्त ५४० हरकतधारक हजर
पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १ ते २९ मध्ये आलेल्या हरकतींची सुनावणी झाली. या २९ प्रभागामध्ये एकूण २९२० हरकती आल्या होत्या. त्यापैकी प्रत्यक्षात ५४० हरकतधारकांनी सुनावणीच्या वेळी हजेरी लावली. त्यात प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळी प्रभाग क्रमांक २४ कमला नेहरू हॉस्पिटल -रास्ता पेठचे सर्वाधिक म्हणजे ८५ हरकतधारक हजर होते.