पुणे : गणपती उत्सव पाहण्यासाठी राज्य आणि राज्याबाहेरील लाखो भाविक पुण्यात येतात. यामुळे पुणे एसटी विभागाकडून भाविकांना ये-जा करण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. या बसेस शनिवारपासून (दि.३०) धावणार आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
पुण्यातील गणेशोत्सव आणि देखावे जगप्रसिद्ध आहेत. त्यामुळे गणेशोत्सव काळात राज्यातील अनेक जिल्ह्यांतून आबालवृद्धांसह महिला, तरुणी देखावे पाहण्यासाठी शहरात येतात. भाविकांना देखावे पाहण्यासाठी येताना व जाताना वाहनांची सोय व्हावी, यासाठी एसटी प्रशासन गर्दीनुसार मराठवाडा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
या संबंधित विभागीय प्रशासनाकडून आगारप्रमुखांना तसे आदेश देण्यात आले आहे. विशेषता गाैरी विसर्जनानंतर देखावे पाहण्यासाठी गर्दी वाढते. त्यामुळे विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि इतर आगारातूनही या जादा बसेस शनिवारपासून धावणार आहेत. त्यामुळे देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांना सोयीचे होणार आहे. शिवाय एसटीला सवलत असल्याने प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. याचा फायदा एसटी आणि प्रवासी या दोघांना होणार आहे.
गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी इतर जिल्ह्यांतून लाखो भाविक पुण्यात येतात. त्यांच्या सोयीसाठी पुणे विभागातून विदर्भ, मराठवाड्यासह सोलापूर, कोल्हापूर, सांगली या भागात जादा बसेस चालविण्यात येणार आहेत. -अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग