ओतूर : जुन्नर तालुक्यातील हिवरे खुर्द येथे शुक्रवारी (दि. २५ जुलै) रात्री दीडच्या सुमारास तीन बिबट्यांनी शेतकरी रबाजी भोर यांच्या गोठ्यावर हल्ला करून एका कालवडीला ठार केले. गोठ्यात बांधलेल्या दोन गायी आणि एका कालवडीवर बिबट्यांनी हल्ला केला. बिबट्यांनी कालवडीला गोठ्यातून बाहेर ओढून तिचा फडशा पाडला. शेजारी राहणारे गोरक्षनाथ माने यांना गायींचा ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता बिबट्यांचा हल्ला सुरू होता. त्यांनी आरडाओरड केली, तरीही बिबटे तिथून हटले नाहीत. नंतर स्थानिक ग्रामस्थ जमा झाल्यावर बिबट्यांनी पळ काढला, पण तोपर्यंत कालवड मृत झाली होती.घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने कारवाई करत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा केला. रबाजी भोर यांनी सांगितले की, परिसरात बिबटे आणि त्यांची बछडी नेहमीच दिसतात. विशेषत: शिव चिदंबर मंदिर परिसरात दोन बिबटे आणि तीन बछडींचा वावर आहे. यामुळे रात्री प्रवास करणे आणि शेतातील कामे करणे धोकादायक झाले आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी सरपंच लक्ष्मण वायकर यांच्यासह ग्रामस्थांनी लावून धरली आहे. परिसरात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हिवरे खुर्द येथे बिबट्यांच्या हल्ल्यात कालवड ठार, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 15:15 IST