पुणे : सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन या गुन्ह्यांच्या शोधासाठी ५ हजार पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या तपासात लक्षणीय यश मिळेल असा विश्वास गृहराज्य व अन्न औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला. अन्न व औषध प्रशासन विभागात ४०० निरीक्षकांची भरती केली असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार भवनच्या कमिन्स सभागृहात गुरूवारी दुपारी कदम यांचा वार्तालाप झाला. प्रास्तविकात कदम यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या खात्यांमध्ये करण्यात येत असलेल्या सुधारणांबाबत माहिती दिली. राज्यमंत्री म्हणून मिळालेल्या अधिकारांमध्ये काम करण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्ऱ्यांसह सर्व मंत्ऱ्यांचे आवश्यक ते सर्व सहकार्य मिळते असे त्यांनी स्पष्ट केले.
सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येबद्दल विचारले असता कदम म्हणाले, “ गुन्ह्यांच्या या प्रकारात तंत्रज्ञान जास्त आहे. त्यामुळेच आता या प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ५ हजार पोलिसांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. त्यात हवालदारापासून ते वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचा समावेश आहे. त्याशिवाय मुंबईत एक संयुक्त केंद्रही तयार करण्यात येत आहे. फिर्याद दाखल झाली की मिनिटभरातच ती या केंद्रापर्यंत पोहचेल व त्यानंतर लगेचच तपासाची सुत्रेही हलतील. या केंद्रांचा देशात, देशाबाहेर अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या सर्व केंद्रांबरोबर संपर्क असेल.”
सरकारमधील राज्यमंत्री त्यांच्या खात्याच्या कॅबिनेट मंत्ऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे नाराज आहेत, त्यातही शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या मंत्ऱ्यांना लक्ष्य केले असल्यासारख्या घटना घडत आहेत याकडे लक्ष वेधले असता कदम म्हणाले, “प्रत्येकच राज्यमंत्ऱ्यांला सुरूवातीच्या काळात संघर्ष करावाच लागतो. काही दिवसांनी दोघांचेही व्यवस्थित जमते. तसाच प्रकार आहे. काही ठिकाणी संघर्ष होतो मात्र ते स्वाभाविक आहे. नेत्यांमध्ये चांगला समन्वय आहे. त्यामुळे संघर्ष झाला तरी तो फार टिकत नाही.”
अन्न औषध प्रशासन विभागाकडे मनुष्यबळ नव्हते हे सत्य आहे. नागरिकांना जागृत करण्यासाठी म्हणून ज्या प्रसार व प्रचार मोहिमा कराव्या लागतात, त्यासाठी त्यांच्याकडे साधे बजेटही नव्हते. आता स्थिती बदलली आहे. ३९४ निरीक्षकांची या खात्यात भरती केली. त्यांचे प्रशिक्षणही झाले आहे. या विभागाला बजेट मिळवून देण्यातही यश आले. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या खात्याचे काम दिसू लागले असे कदम यांनी सांगितले. गुटखा विक्री सर्रासपणे सुरू आहे हेही त्यांनी मान्य केले व त्याविरोधात मोहिम सुरू करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती दिली. संघाचे अध्यक्ष ब्रीजमोहन पाटील यांनी स्वागत केले. सरचिटणीस मंगेश फल्ले यांनी प्रास्तविक केले. उपाध्यक्ष सागर आव्हाड यांनी आभार व्यक्त केले.
ज्या बारचे प्रकरण विधानसभेत उपस्थित करण्यात आले तो बार आपण चालवत नव्हतो. तो काही माझा व्यवसाय नाही. जागा आमची होती, ती भाडेतत्वावर दिली होती व आम्ही भाडे स्विकारत होतो असे समर्थन कदम यांनी केले. सरकारमधील मंत्री सातत्याने वादग्रस्त होत आहेत हे खरे आहे, मात्र ती त्यात्या वेळची स्थिती असते, विरोधक त्याचे भांडवल करतात असे ते म्हणाले.