पुणे : काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शनिवारी (दि.२२) पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच पुणे जिल्हा शाखांच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या तसेच पक्षाच्या आजीमाजी लोकप्रतिनिधींच्या ते काँग्रेसभवनमध्ये बैठका घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच पुणे दौरा असून त्यामुळेच त्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचा मागील जवळपास तीन पंचवार्षिक सलग पराभव होतो आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ काँग्रेसकडे नाही. तीन आमदार होते, मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचाही पराभव झाला. काँग्रेसचा एकही आमदार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकाच मागील ३ वर्षे झालेल्या नाहीत. त्यामुळे तिथेही पक्षाचा कोणीही नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य नाही. एकूणच राजकीय दृष्ट्या जिल्ह्यात काँग्रेसला सध्या तरी एकही लोकनियुक्त म्हणजे निवडून आलेला लोकप्रतिनिधी नाही.संघटनात्मक स्तरावर पक्षाला अस्तित्व आहे, मात्र ते क्षीण झालेले आहे. अनेक ठिकाणी पक्षाच्या शाखा फक्त नावापुरत्या आहेत. जवळपास प्रत्येक ठिकाणी पक्षाला गटबाजीने ग्रासले आहे. पुणे शहरही त्याला अपवाद नाही. गटबाजीने पक्षाचे अतोनात नुकसान झाले असल्याचे जुन्या काँग्रेसजनांचे म्हणणे आहे. प्रदेशस्तरावरूनच या गटबाजीला खतपाणी घातले जाते असाही त्यांच्यातील काहींचा आरोप आहे. एकाच विषयाचे तीनतीन ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. पक्षाच्या शहर महिला आघाडीला अध्यक्षच नाही. वेगवेगळ्या आघाड्या फक्त पद व नावापुरत्या शिल्लक राहिल्या आहेत. विद्यार्थी संघटना, युवक शाखांचे अस्तित्व दिसत नाही.नवे प्रदेशाध्यक्ष यात प्राण फुंकतील अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. पुण्यातील अनेक काँग्रेसजनांना, ते काही करतील असे वाटत असल्याचे दिसते. खासगीत तसे ते बोलून दाखवतात. बहुसंख्य काँग्रेसजनांच्या त्यातही दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अपेक्षा प्रदेशाध्यक्ष होताच सपकाळ यांनी बीड जिल्ह्यात काढलेल्या सदभावना यात्रेमुळे उंचावल्या आहेत. शनिवारी प्रदेशाध्यक्ष दिवसभर पुण्यात असून ते या समस्यांवर तोडगा काढतील असे या कार्यकर्त्यांना वाटते.
काँग्रसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुणे दौऱ्यावर; महत्वाची बैठक घेणार
By राजू इनामदार | Updated: March 20, 2025 15:00 IST