पुणे : शहरातील कचरा संकलन, वाहतूक, रॅम्पवरून तो प्रक्रिया प्रकल्पात पाठवला जातो. मात्र, ही कामे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केली जात असल्याने ती प्रभावीपणे होत नाहीत. त्यामुळे कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करणारे ७ रॅम्प असून, या रॅम्पची अवस्था वाईट आहे. त्याने कचऱ्याची दुर्गंधी, लिचेट, पक्षी तसेच अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पसरते. त्यामुळे येत्या काही दिवसांत या रॅम्पचे इंदोरच्या धर्तीवर यांत्रिकीकरण करून कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. त्याबरोबरच कचऱ्याची वाहतूक बंदिस्त पद्धतीने करण्यात येणार आहे, यासाठी टास्क फोर्स तयार करून तातडीने ही कामे करण्यात येणार असल्याची माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
शहरातील कचरा रॅम्पची अवस्था बिकट आहे. या ठिकाणी अनेक समस्या आहेत. योग्य पद्धतीने वर्गीकरण या ठिकाणी होत नाही तसेच निर्जंतुकीकरणाची देखील मोठी समस्या आहे. त्यातच हडपसर परिसरातील कचरा रॅम्पच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा उघड्यावर पडत असल्याने तसेच उघड्या वाहनांमधून वाहतूक होत असल्याने या रॅम्पच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा उपद्रव वाढला आहे. त्याचा फटका लोहगाव विमानतळाला बसत असून, या पक्ष्यांमुळे विमानांना उड्डाण करताना तसेच उतरताना धोका निर्माण झाला आहे. पुणे महापालिकेने केवळ कात्रज येथील रॅम्पचे इंदोरच्या धर्तीवर यांत्रिकीकरण करण्यात आलेले आहे. त्या दृष्टीने पावले उचलली जात आहे. कॉमप्रेस बायोगॅसची निर्मती करून त्याचा वापरदेखील करण्यात येणार असल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासह त्याचा पुनर्वापराचा प्रश्न गंभीर आहे. या पाण्याचा वापर उद्योग, सरकारी संस्था या मार्फत करता येणे शक्य असून, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. जागतिक बँकेकडून जो निधी उपलब्ध होऊन त्यातून सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात येतील. शहरात ज्या एसटीपी प्रकल्पाची बांधणी सुरू आहे, ते पूर्ण होण्यास मार्च २०२६ चा कालावधी लागणार असून, यानंतर ही समस्या दूर होईल, असे नवल किशोर राम यांनी सांगितले.
५० कोटींचा निधी वेगळा ठेवणार
कचऱ्याच्या प्रश्न सोडवण्यासाठी जी पावले उचलण्यात येणार आहे, त्यासाठी निधी लागणार आहे. त्यादृष्टीने ५० कोटी रुपयांचा निधी हा वेगळा ठेवला जाणार आहे. या माध्यमातून तातडीची कामे केली जाणार असल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.