पुणे : पुणेकरांना वाहतूक काेंडीतून मुक्त करेल अशी अाशा असलेल्या पुण्यातील मेट्राेचे काम सध्या प्रगतीपथावर असल्याचे चित्र अाहे. पिंपरी-चिंचवड येथील मेट्राेचे काम वेगात सुरु असताना, अाता वनाझ ते रामवाडी या मार्गावरील मेट्राेचे कामही लवकर करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात पुणेकरांना मेट्राेतून प्रवास करणे शक्य हाेणार अाहे. वनाझ ते रामवाडी या मार्गावरील मेट्राे नदीपात्रातून जाणार असल्याने अनेक पर्यावरण प्रेमी संस्थांकडून विराेध केला जात हाेता. 7 डिसेंबर 2016 ला कॅबिनेटने या मार्गाला हिरवा कंदील दाखवल्याने या मार्गाचे काम सुरु झाले. सध्या पाैड राेडवर तसेच नदीपात्रात मेट्राेचे काम वेगात सुरु अाहे. पाैड राेडवर काही ठिकाणी मेट्राेचे पिलर उभारण्याचे काम पूर्ण झाले अाहे. तर नदीपात्रात पिलर उभारण्याचे काम प्रगतीपथावर अाहे. कर्वेराेडवरील गरवारे महाविद्यालयाच्या समाेरही पिलर उभारण्याचे काम करण्यात येत अाहे. त्यासाठी या ठिकाणचा रस्ता नाेपार्किंग घाेषित करण्यात अाला अाहे. याचपद्धतीने पाैडराेडवर जेथे मेट्राेचे काम चालू अाहे, त्या भागात नाे पार्कींग झाेन करण्यात अाला अाहे. वनाझ ते रामवाडी या 14 किलाेमीटरच्या मार्गात 16 स्टेशन्स असणार अाहेत. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट 16 किलाेमीटरच्या मार्गात 15 स्टेशन्स असणार अाहेत. पिंपरीतील मेट्राेचे कामही वेगात सुरु अाहे. याबाबत बाेलताना पुणे मेट्राेचे मुख्य प्रकल्प अधिकारी गाैतम बिराडे म्हणाले, पुण्यातील मेट्राेचे काम वेगात सुरु असून अात्तापर्यंत 47 ठिकाणी पिलरच्या पायाचे फाउंडेशन पूर्ण झाले अाहे. तसेच 20 ठिकाणी पिलरचे काम सुरु अाहे. त्याचबराेबर मेट्राे स्टेशन्सचे कामही सुरु करण्यात अाले असून वनाझ, अानंदनगर, अायडिअल काॅलनी येथील स्टेशन्सचे काम सुरु करण्यात अाले अाहे.
पुणे मेट्राेचे काम प्रगतीपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 13:56 IST