पुण्यातील मेट्रोचा फेरआढावा घेणार
By Admin | Updated: November 8, 2014 00:20 IST2014-11-08T00:20:51+5:302014-11-08T00:20:51+5:30
केंद्रशासनाकडे सादर केलेल्या पुणे शहरातील मेट्रोचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असताना या प्रस्तावाचा फेरआढावा

पुण्यातील मेट्रोचा फेरआढावा घेणार
पुणे : केंद्रशासनाकडे सादर केलेल्या पुणे शहरातील मेट्रोचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असताना या प्रस्तावाचा फेरआढावा घेऊन त्यामध्ये राहिलेल्या त्रुटी दूर करणार तसेच तज्ज्ञांशी पुन्हा एकदा चर्चा करून योग्य ते बदल मेट्रो प्रकल्पात केले जाणार असल्याची माहिती शहरातील भाजपच्या आमदारांनी दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने नवनिर्वाचित आमदारांशी वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. आमदार माधुरी मिसाळ, विजय काळे, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहराच्या विविध प्रश्नांवर सावधपणे उत्तरे देताना हे प्रश्न सोडविण्यासाठी पुणेकरांनी थोडा वेळ द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शहरातील वाहतुकीचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे स्पष्ट करून माधुरी मिसाळ म्हणाल्या, ‘‘शहरातील मेट्रोचा प्रस्ताव तयार करताना त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या आहेत. त्यातील काही अडचणी आता लक्षात आल्या आहेत. त्यामुळे त्याचा फेरआढावा घेऊन नव्याने सुधारित प्रस्ताव सादर केला जाईल. तसेच, पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पाणीगळती रोखण्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.’’ (प्रतिनिधी)