पुणे: बिहार विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी पाटणा येथे मेट्रो सुरू करण्यासाठी केंद्र सरकारची धडपड सुरू आहे. त्यामुळे पुणेकरांची तयार असलेली मेट्रो पाटण्याला पळवण्यात आली असा आरोप प्रदेश युवक काँग्रेसने केला. तीन डब्यांची ही मेट्रो त्वरीत परत आणावी अन्यथा महामेट्रो कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे म्हणाले, “भारतीय जनता पक्षाला बिहारची विधानसभा निवडणुक जिंकायचीच आहे. तेथील मतदारांना खूश करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जात आहेत. पाटणा येथे मेट्रोचे काम सुरू आहे. चाचणी घेण्यासाठी म्हणूनही त्यांच्याकडे मेट्रो नाही. पुण्यात महामेट्रो कंपनीची एक राखीव मेट्रो होती. राजकीय दबाव टाकून केंद्र सरकारने ही मेट्रो ३ वर्षांसाठी म्हणून पाटणा मेट्रो ला द्यायला लावली. हा एकूण प्रकारच पुणेकर मेट्रो प्रवाशांवर अन्याय करणारा आहे.
वास्तविक पुणे शहरात मेट्रो ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. दररोज १ ते दीड लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. त्यामुळेच मेट्रो मार्ग विस्तार होणार असल्याने गाड्यांची वारंवारिता वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी म्हणून महामेट्रोने राखीव संच ठेवले आहेत. त्यातीलच एक संच बिहारला पाठवण्यासाठी केंद्र सरकारने महामेट्रो कंपनीवर दबाव आणला असे आबनावे म्हणाले.
हे करताना पुण्याचे खासदार, आमदार, पालकमंत्री तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही अशीही टीका आबनावे यांनी केली. निवडणुकीपूर्वी मेट्रो सेवेचे श्रेय घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने केंद्र सरकारच्या माध्यमातून पुणे शहराच्या विकासावर हा घालाच घातला आहे असे ते म्हणाले. ही ट्रेन परत पुण्याला मागवून घ्यावी, अन्यथा महामेट्रोच्या कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा आबनावे यांनी दिला.