पुणे : महापालिका निवडणुकीनंतर आता महापौर आणि उपमहापौर या पदांची निवडणूक ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यासंदर्भात लवकरच निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपचे ११९ नगरसेवक निवडून आल्याने महापौर आणि उपमहापौर पदावर भाजपचेच नगरसेवक विराजमान होणार, हे निश्चित झाले आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने काढलेल्या महापौर पदाच्या सोडतीमध्ये पुण्याचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबतची उत्सुकता लवकरच संपणार आहे.
राजकीय पक्षांची विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून नगरसचिव कार्यालय हे विभागीय आयुक्त कार्यालयाशी पत्रव्यवहार करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांंची नियुक्ती आणि पहिली सर्वसाधारण सभा घेण्याची परवानगी घेते. या सभेतच महापौर पदासाठी निवडणूक घेतली जाते. त्यानुसार नगरसचिव कार्यालयाने विभागीय आयुक्तांशी पत्रव्यवहार केला असून, त्यानुसार पहिली विशेष सर्वसाधारण सभा ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या सभेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवड करण्यात येणार आहे. महापौर, उपमहापौर निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार आल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
आतापर्यंत नऊ महिलांनी भूषविले महापौरपद
पुणे महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत नऊ महिलांनी महापौरपद भूषवले आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने कमल व्यवहारे यांना १९९२ मध्ये पुण्याच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान मिळाला. त्यानंतर ॲड. वंदना चव्हाण, वत्सला आंदेकर, दीप्ती चवधरी, रजनी त्रिभुवन, राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, चंचला कोद्रे, मुक्ता टिळक आणि इतरांनी महापौर म्हणून काम पाहिले आहे.
Web Summary : Pune's mayoral election is set for February 6th. BJP likely to win. The post is reserved for a woman.
Web Summary : पुणे में महापौर का चुनाव 6 फरवरी को होगा। भाजपा की जीत की संभावना। पद एक महिला के लिए आरक्षित है।