जागतिक स्मार्ट सिटीच्या अंतिम यादीत पुणे
By Admin | Updated: November 14, 2016 02:51 IST2016-11-14T02:51:45+5:302016-11-14T02:51:45+5:30
जागतिक स्मार्ट सिटीच्या अंतिम यादीत पुणे

जागतिक स्मार्ट सिटीच्या अंतिम यादीत पुणे
पुणे : केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्मार्ट सिटी स्पर्धेमध्ये देशभरातून दुसरा क्रमांक पटकाविणाऱ्या पुणे शहराची निवड जागतिक स्मार्ट सिटीच्या अंतिम यादीत करण्यात आली आहे. अंतिम ६ शहरांमध्ये पुण्यासह हॉलंड क्रून (नेदरलँड), न्यूयॉर्क (अमेरिका), मोस्को (रशिया), जिक्वान (चीन), सेऊल (रिपब्लिक आॅफ कोरिया) समावेश करण्यात आला आहे. जागतिक स्मार्ट सिटी पुरस्कारांची घोषणा येत्या बुधवारी, १६ नोव्हेंबरला होणार असून, पुण्याला हा पुरस्कार मिळणार का, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
स्पेन शहरातील बर्सेलिना शहरामध्ये १५ ते १७ नोव्हेंबर कालावधीमध्ये ‘स्मार्ट सिटी एक्स्पो जागतिक परिषद’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये तज्ज्ञांकडून जागतिक स्मार्ट सिटी पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे. फिरा आणि बर्सेलिना महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
परिषदेमध्ये स्मार्ट सिटींसाठी ३ प्रकारच्या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यामध्ये सर्वोकृष्ट स्मार्ट शहर पुरस्कर, सर्वोकृष्ट प्रोजक्ट पुरस्कार व सर्वोत्तम नाविण्यपूर्णता आदी ३ प्रकारचे पुरस्कार दिले जाणार आहेत. यासाठी जगभरातून अडीच हजार शहरांनी प्रस्ताव पाठविले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजना जाहीर करून स्पर्धात्मक पातळीवर यासाठी शहरांची निवड करण्यात येईल असे जाहीर केले.
देशभरातून घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये पहिल्या टप्प्यात १०० शहरांची निवड करण्यात आली आहे, यामध्ये पुण्याने देशभरातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
स्मार्ट सिटी योजनेतील लोकसहभागामध्ये पुणे देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. पुणे शहरामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत पुढील ५ वर्षात ३ हजार कोटींची कामे करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)