पुणे : लग्नानंतर एका वर्षाच्या आत घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेणाऱ्या पतीला न्यायालयाने दणका दिला आहे. घटस्फोटाचा हा अर्ज न्यायाधीश बी. डी. कदम यांनी फेटाळला आहे. हिंदू विवाह कायदा, कलम १४ नुसार विवाह झाल्यानंतर एक वर्षाच्या आत घटस्फोटासाठी दावा दाखल करता येत नाही. ही बाब पत्नीच्या वकिलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार सुनावणी सुरू करण्यापूर्वीच घटस्फोटाचा हा अर्ज न्यायालयाने फेटाळला.
पत्नीच्या वतीने ॲड. पुष्कर पाटील, ॲड. प्रणव मते आणि ॲड. अमित केंद्रे यांनी युक्तिवाद केला. राकेश आणि स्मिता (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. तो ३३ वर्षाचा असून, शासकीय नोकरीत उच्च पदावर आहे. तर, ती ३० वर्षांची असून, खासगी नोकरी करते. सप्टेंबर २०२४ मध्ये दोघांचा विवाह झाला. दोघात वाद होऊ लागले. त्यामुळे हिंदू विवाह कायदा कलम १३ नुसार माधवने घटस्फोटासाठी अर्ज केला. यास पत्नीच्या वकिलांनी विरोध केला.
कलम १४ हे विवाह संस्थेच्या रक्षणासाठी खास आहे. घटस्फोटासाठी पात्र ठरण्यासाठी विवाहास एक वर्षाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा विवाहानंतर तत्काळ पती-पत्नींच्या छोट्या मतभेदांवरून स्थायित्व गमावून वैवाहिक नाते मोडण्याची शक्यता असते आणि याच कारणासाठी कायद्यात ही अट असल्याचे पत्नीच्या बाजूने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या युक्तिवादांवर विचार करताना न्यायालयाने नमूद केले की, ‘कलम १४ नुसार विवाहास एक वर्ष पूर्ण होण्याआधी दाखल झालेली याचिका कायद्यानेच निष्क्रिय मानली जाते. त्यामुळे ही याचिका कायदेशीर आधार नसल्याने ग्राह्य धरता येणार नाही.’ त्याअनुसार, न्यायालयाने अर्ज फेटाळला.