पुण्याला हुडहुडी?
By Admin | Updated: December 17, 2014 05:26 IST2014-12-17T05:26:18+5:302014-12-17T05:26:18+5:30
मागील दोन दिवसांपासून शहरातील किमान तापमानाचा पारा खाली उतरत असून, पुढील ४८ तासांत आणखी घट होण्याची शक्यता हवामानखात्याने वर्तविली

पुण्याला हुडहुडी?
पुणे : मागील दोन दिवसांपासून शहरातील किमान तापमानाचा पारा खाली उतरत असून, पुढील ४८ तासांत आणखी घट होण्याची शक्यता हवामानखात्याने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत शहरात नागरिकांना हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचा अनुभव येऊ शकतो. दरम्यान राज्यात मंगळवारी नाशिक येथे सर्वांत कमी ७.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
कमी दाबाचा पट्टा ओसरत गेल्याने राज्यात पुन्हा थंडी परतली आहे. पुण्यासह मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत सरासरीपेक्षा किंचिंत घट झाली आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी राज्यात नाशिक येथे सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल अहमदनगर व मालेगाव येथे ९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.
राज्यातील बहुतेक प्रमुख शहरांचे किमान तापमान १० ते १२ अंश सेल्सिअसच्या जवळपास होते. पुणे शहरात १०.६ अंश सेल्सिअस तर लोहगाव व पाषाण येथे अनुक्रमे १२.१ व १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. (प्रतिनिधी)