सहकारनगर (पुणे) : पर्वती टेकडीवर साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात पर्वती पाेलिसांना यश आले. हा खून आर्थिक वादातून झाल्याचे उघडकीस आले असून, एका २६ वर्षीय तरुणाला याप्रकरणी अटक करण्यात आली.
सुरेखा संतोष चव्हाण (वय ३६, रा. वेताळनगर, खेड शिवापूर, ता. हवेली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सागर दादाहरी साठे (वय २६, रा. सुतारदरा, कोथरूड) याला अटक करण्यात आली आहे. १७ ऑगस्ट २०२० रोजी पर्वती टेकडीवरून तळजाईकडे जाणाऱ्या रस्त्यावर महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. याबाबत मागील साडेतीन वर्षांपासून तपास सुरू हाेता. त्याअनुषंगाने पुणे शहर आणि जिल्ह्यातून ऑगस्ट २०२० मध्ये बेपत्ता झालेल्या महिलांची माहिती घेण्यात आली. यामध्ये रोहन संतोष चव्हाण याने राजगड पोलिस ठाण्यात त्याची आई बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती.
पोलिसांनी रोहनकडे केलेल्या चाैकशीवरून संशयित म्हणून पाेलिसांनी आराेपी साठेला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आर्थिक वादातून सुरेखा यांचा खून केल्याची माहिती दिली.