पुण्याच्या मुलीनं बनवलं 'पार्किन्सन'वर डिव्हाइस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:15 IST2021-02-05T05:15:36+5:302021-02-05T05:15:36+5:30
पुणे : जुई केसकर या पुण्यातील विद्यार्थीनीला आयरीस (IRIS) चा 'ग्रँड अवॉर्ड 20-21' जाहीर झाला आहे. तिने 'कंपवात' म्हणजेच ...

पुण्याच्या मुलीनं बनवलं 'पार्किन्सन'वर डिव्हाइस !
पुणे : जुई केसकर या पुण्यातील विद्यार्थीनीला आयरीस (IRIS) चा 'ग्रँड अवॉर्ड 20-21' जाहीर झाला आहे. तिने 'कंपवात' म्हणजेच 'पार्किन्सन' या आजारात डॉक्टर आणि रुग्ण यांची मदत होईल असे 'जे ट्रिमर थ्री डी' हे डिव्हाइस बनवले आहे. जुई पुण्यातील ऑर्किड स्कुलमध्ये नववीत शिकते आहे. यामुळे पुण्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
पार्किन्सन डिसिज असा एक रोग आहे हेही आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित नसेल. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतात दरवर्षी या रोगाच्या जवळपास सहा लाख केसेसची नोंद होते! पार्किसन्स हा आपलं शारिरीक आणि मानसिक अस्थैर्य निर्माण करणारा आजार आहे. कित्येक जणांना तर आयुष्यभर या आजाराशी झगडतच राहावं लागतं. या आजाराचं गांभीर्य लक्षात घेत पुण्यातील जुई केसकर या विद्यार्थीनीनं पार्किन्सनचे ट्रिमर्स म्हणजेच झटके मोजता येतील आणि त्यानुसार डॉक्टरांनाही योग्य इलाज करता येईल यासाठी एक डिव्हाइस बनवलं आहे.
मुळात या आजाराबाबत जनजागृती नसल्यानं पार्किन्सन बळावतो तरी बऱ्याच जणांना त्याचा अंदाज येत नाही. पार्किन्सनचे झटके मोजण्यासाठी 'जे ट्रिमर थ्री डी' नावाचं परिधान करु शकणारं डिव्हाइस जुईनं बनवले आहे. त्याविषयी ती सांगते की, 'माझ्या काकांना पार्किन्सन आहे. यात आपल्या बुद्धीवरचे संपूर्ण नियंत्रण आपण गमावून बसतो. हात-पाय सतत थरथरत असतात. औषध घेतल्यास केवळ दोन तास आराम मिळतो, पण औषध संपूर्ण दिवस घेता येत नाही. पार्किन्सनवर उपचार करण्यासाठी भारतात केवळ दोन हॉस्पिटल आहेत. या आजारावरचे उपचारही फार महाग आहेत. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेता मी हे डिव्हाइस बनवता यावं म्हणून काही ऑनलाईन अभ्यासक्रम केलेत. डिव्हाइससाठी लागणारी सामग्री ऑनलाईन उपलब्ध झाली.'
जुईने 'जे ट्रिमर थ्री डी' या डिव्हाइससाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम नॅशनल अवॉर्ड फॉर चिल्ड्रेन इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी २०२० हा पुरस्कारही पटकावला आहे. तिला इतरही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
जुई ही लवकरच युएसमध्ये होणाऱ्या रिजेनरन इंटरनॅशनल सायन्स अँड इंजिनियरींग फेअर या समारंभामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. हा जगातला सगळ्यात मोठा विज्ञान समारंभ आहे.
----------------------------