पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी शहरात नागरिकांना वाहने आणता येणार आहेत. परंतु, वाहने मिरवणूक असलेल्या रस्त्यांवर नेता येणार नाहीत. पुणे पोलिसांनी शहराच्या आसपास वाहने पार्क करण्यासाठी १३ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली असून, तेथे वाहने पार्क करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
पार्किंगसाठी ही आहेत १३ ठिकाणे...
शिवाजी आखाडा वाहनतळ, मंगळवार पेठ (दुचाकी आणि चारचाकी), एसएसपीएमएस मैदान (दुचाकी आणि चारचाकी), स. प. महाविद्यालय, टिळक रस्ता (दुचाकी आणि चारचाकी), पेशवे उद्यान, सारसबाग, (दुचाकी), पाटील प्लाझा, मित्रमंडळ (दुचाकी), दांडेकर पूल ते गणेश मळा (दुचाकी), नीलायम चित्रपटगृह (दुचाकी), संजीवनी वैद्यकीय महाविद्यालय मैदान, कर्वे रस्ता (दुचाकी आणि चारचाकी), फर्ग्युसन महाविद्यालय मैदान (दुचाकी आणि चारचाकी), जैन हॉस्टेल मैदान, बीएमसीसी रस्ता (दुचाकी आणि चारचाकी), मराठवाडा महाविद्यालय (दुचाकी), नदीपात्र ते भिडे पूल (दुचाकी आणि चारचाकी).
१० ठिकाणी नो पार्किंग...
लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता येथे नो पार्किंग आहे. त्यासोबतच खंडुजीबाबा चौक ते वैशाली हॉटेलपर्यंत उपरस्त्यांना जोडणाऱ्या दोन्ही बाजूंना १०० मीटर परिसरात पार्किंगला बंदी केली आहे.
४८ तास जड वाहतुकीला बंदी..
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती शहरात अवजड वाहनांना तब्बल ४८ तास बंदी घालण्यात आली आहे. ६ सप्टेंबर मध्यरात्री १२ ते ७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत जड वाहन चालकांनी मध्यवर्ती भागात वाहने आणू नयेत. अन्यथा, कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक विभागाने दिला आहे.