पुणे : गणपती बाप्पा मोरया... श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय... मोरया, मोरया... च्या जयघोषात आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत 'दगडूशेठ' गणपतीची श्री गणनायक रथातून वैभवशाली सांगता मिरवणूक पार पडली. अनंत चतुदर्शी ला रात्री ९.२५ च्या सुमारास हौदात मूर्तीचे विसर्जन करून बाप्पाला निरोप देण्यात आला. सलग तिसऱ्या वर्षी दुपारी ४ वाजता बेलबाग चौकातून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यावेळी लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांनी अलोट गर्दी केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३३ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला थाटात निघाली. श्री गणनायक रथाची मांडणी यंदाची प्रतिकृती असलेल्या केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या विषयाप्रमाणे करण्यात आली होती.
मिरवणुकीच्या अग्रभागी असलेला मानवसेवा रथ दुपारी ४ वाजता बेलबाग चौकात दाखल झाला. त्यामध्ये सनई-चौघडा देखील होता. त्यापाठोपाठ स्वरूपवर्धिनीचे पथकातील वादकांनी ढोल ताशा वादनासोबतच सामाजिक संदेश देणारे सादरीकरण देखील केले.
केरळचे चेंदा मेलम पथक हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले. यावेळी पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त देखील मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. टिळक चौकात रथाचे आगमन होताच हा क्षण डोळ्यात साठविण्यासाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती.