पुणे : पुण्यातील स्वारगेट परिसरात आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गणपती विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडली. या मिरवणुकीत डीजे आणि ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. हजारो भाविकांनी गणपती बाप्पाला निरोप देताना "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" अशा घोषणा देत उत्साहात सहभाग घेतला.
स्वारगेट येथील मिरवणूक ही पुण्यातील गणेशोत्सवातील एक महत्त्वाचा भाग मानली जाते. यंदा मिरवणुकीत डीजे संगीताने तरुणाईला भुरळ घातली. पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर नाचणाऱ्या तरुणांसह, डीजे वर आधुनिक आणि पारंपरिक गाण्यांच्या मिश्रणाने वातावरण उत्साहपूर्ण बनले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या अनेक गणेश मंडळांनी आपल्या सजावटी आणि डीजे साउंड सिस्टीमद्वारे लक्ष वेधले. मात्र, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी पोलिसांनी ठरवून दिलेल्या डेसिबल मर्यादांचे पालन करण्याचे आवाहन मंडळांना करण्यात आले होते.
सुवर्ण रथ ठरला आकर्षण
पर्वती येथील नवनाथ मित्र मंडळाचा सुवर्ण रथ सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. मंडळाने यावर्षी50 व्या वर्षी आकर्षक सुवर्ण रथ तयार केला होता. तसेच पर्वती दर्शन येथील मंडळाने आकर्षक फुलांची सजावट केली होती.