पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात भव्य ड्रोन लाईट शो आयोजित केला होता. अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात प्रथमच झालेल्या या शोने पुणेकरांचे लक्ष वेधले. ४५ मिनिटे चाललेल्या या थ्रीडी शोमधून मोदी सरकारची कामगिरी, तसेच पुण्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसे साकारण्यात आले. हजारो ड्रोन आकाशात झेपावले आणि पुण्याच्या अनेक भागांतून नागरिकांनी हा देखावा अनुभवला.
मात्र या शोसोबतच टीकेची झोड उठल्याचे पाहायला मिळाले. समाजमाध्यमांवर नागरिकांनी "ड्रोन उडवताना पुण्याचे खड्डे आणि नागरी समस्या दिसतात का?" असा सवाल खासदारांना केला. तसेच एवढा खर्च कशासाठी, यावरून चर्चांना ऊत आला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी थेट या खर्चाचे कॅल्क्युलेशन मांडत खासदार मोहोळांवर निशाणा साधला. "१००० ड्रोन आकाशात अर्धा तास उडविण्यासाठी तब्बल एक कोटी रुपये खर्च येतो. त्यात इतर व्यवस्थापनाचा खर्च धरला, तर कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. या रकमेतून पुण्यातील ससून रुग्णालयाचे किती मोठे काम झाले असते, याचा विचार तरी केलाय का?" असा सवाल करत त्यांनी टोला लगावला – “हवेत उडणाऱ्यांनी जमिनीवरही लक्ष द्यावे, अन्यथा पुणेकर महापालिका निवडणुकीत तुम्हाला आसमान दाखवतील.”
याशिवाय वसंत मोरे यांनी सोशल मीडियावरूनही खासदारांवर टीका केली. “ड्रोन शोबाबतच्या पोस्टवर नागरिकांनी केलेल्या असंख्य नकारात्मक कमेंट्स खासदारांनी डिलीट करण्यासाठी माणसे बसवली होती,” असा आरोपही त्यांनी केला. पुण्यातील या भव्य शोने नागरिकांचे डोळे दिपवले, पण त्याचसोबत खर्च व प्राधान्यक्रमांवरून राजकीय वादंगही पेटले आहे."