पुण्याच्या पाण्यात कपात नाही
By Admin | Updated: May 5, 2016 04:35 IST2016-05-05T04:35:38+5:302016-05-05T04:35:38+5:30
पुणे शहरातून प्रचंड राजकीय विरोध असतानाही खडकवासला धरणातून बुधवारी दुपारी एक वाजता दौंड आणि इंदापूर या तालुक्यांसाठी कालव्यातून पाणी सोडण्यात आले. या वेळी धरण

पुण्याच्या पाण्यात कपात नाही
पुणे : पुणे शहरातून प्रचंड राजकीय विरोध असतानाही खडकवासला धरणातून बुधवारी दुपारी एक वाजता दौंड आणि इंदापूर या तालुक्यांसाठी कालव्यातून पाणी सोडण्यात आले. या वेळी धरण परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता; मात्र कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पाणी सोडण्याच्या निर्णयावरून सर्व राजकीय पक्षांकडून पालक मंत्री गिरीश बापट यांना लक्ष्य करण्यात येत असताना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सर्व जबाबदारी आपल्यावर घेतली असून, आपणच हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
कालव्यात ६०० क्युसेक्सने नवी मुठा उजवा कालव्यातून पाणी सोडण्यात आले. पाण्याची चोरी व कालवा फोडण्यासारखा कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी कालवा परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तब्बल १५० पेक्षा अधिक विद्युत मोटारी जप्त करून कालव्यातून पाण्याचा विर्सग सुरू असेपर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे दोन दिवसांपासून शहरात राजकीय वाद निर्माण झाला होता. शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस व मनेसे यांनी बापट यांच्यावर तीव्र टीका केली होती. आजही शिवसेनेच्या वतीने कसबा गणपतीची आरती करून पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध करण्यात आला. कॉँग्रेसच्य वतीने या निर्णयाच्या विरोधात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
पाणी सोडल्यानंतर जिल्हाधिकारी सौरभ राव आणि पाटबंधारे पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतील. या वेळी राव म्हणाले, ‘‘खडकवासला प्रकल्पातून दौंड आणि इंदापूर या शहरांना पाणी सोडण्यासाठी १५ दिवसांपासून नियमित आढावा बैठका घेण्यात आला. बापट यांनीदेखील शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या कालवा, नवीन बंद पाईपलाईन यांची पाहणी केली. दौंड, इंदापूर तालुक्यांत टँकर भरण्याचे स्रोतदेखील आटल्यामुळे येथील तब्बल पावणेचार लाख लोक व एक लाख ७५ हजार लहान-मोठ्या जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे एक मे रोजी खडकवासला प्रकल्पातून एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरासाठी नवीन बंद पाईपलाईनमुळे दर महिन्याला ०.१० टीएमसी पाणी बचत होणार असून, त्यामुळे पहिल्यादा मृत साठादेखील उचलता येईल. यामुळे पुणे शहरात पाणीकपात न करता दौंड व इंदापूरसाठी पाणी सोडण्यात आले आहे.’’
१९ मेपर्यंत विसर्ग सुरू राहणार
दौंड, इंदापूरसाठी खडकवासला धरणातून बुधवारी दुपारी १ पासून ६०० क्युसेक्सन एक टीएमसी पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार असून, सुमारे १,१०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येईल. हे पाणी २२० किलोमीटरचा प्रवास करून इंदापूर येथील शेवटच्या तरंगवाडी तलावात पोहोचण्यासाठी १२ ते १३ दिवस लागणार आहेत. त्यामुळे खडकवासला धरणातून १९ मेपर्यंत विसर्ग सोडण्यात येणार आहे.