पुणे : डीएसके दाम्पत्याला सात दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 11:14 PM2018-02-17T23:14:46+5:302018-02-17T23:16:34+5:30

उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन काढून घेतल्यानंतर शनिवारी (17 फेब्रुवारी) पहाटे बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यासह दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले.

Pune: DKK's seven-day police custody | पुणे : डीएसके दाम्पत्याला सात दिवसांची पोलीस कोठडी

पुणे : डीएसके दाम्पत्याला सात दिवसांची पोलीस कोठडी

googlenewsNext

पुणे : उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन काढून घेतल्यानंतर शनिवारी (17 फेब्रुवारी) पहाटे बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यासह दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले. सायंकाळी पुण्यात न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 23 फेब्रुवारीपर्यंत  7 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावणीच्या दरम्यान विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी डी. एस. कुलकर्णी यांनी त्यांच्या 7 प्रमुख भागीदार संस्थांमधून मोठ्या प्रमाणावर ठेवी गोळा केल्या आहेत. त्यातील मोठा भाग हा त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या वैयक्तिक खात्यामध्ये वळविला आहे. त्यानंतर त्या खात्यातून तो डी. एस. कुलकर्णी, त्यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी व इतरांच्या वैयक्तिक खात्यात वळविण्यात आल्याचे सांगितले.

उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांचा जामीन काढून घेतला. असा निर्णय होणार असल्याची जाणीव असा काही निर्णय होऊ शकतो याची जाणीव असल्याने डीएसके अगोदरच पसार झाले होते. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी शुक्रवारी (16 फेब्रुवारी) चार पथके  मुंबई, दिल्ली व इतर ठिकाणी रवाना केली होती.  डीएसके यांच्या मोबाइलवरील कॉल रेकॉर्डवरुन ते दिल्लीत असल्याचे पोलिसांना समजले.  सायबर क्राईमचे दोन अधिकारी व कर्मचारी हे अगोदरच दिल्लीला होते. दिल्लीतील वसंत कुंज भागातील डीएमसी क्लबमध्ये शनिवारी पहाटे दोघांना ताब्यात घेण्यात आले. विमानाने त्याना सायंकाळी पुण्यात आणले. ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्या नंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या समोर हजर केले गेले.

विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी सांगितले की, कुलकर्णी यांनी आपल्या प्रमुख ६ भागीदारी संस्थांमधून १ हजार ३५३ कोटी रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या आहेत. २०१५ पासून कंपनीचे काम व्यवस्थित सुरु नव्हते. त्यांनी १६ प्रकल्पातून २ हजार ८९२ कोटी रुपयांचे कर्ज उभारले आहेत. दुसरीकडे त्यांच्याकडे फ्लॅट बुक केलेल्यांच्या कर्जाचे पैसे घेतले आहेत. पण, कोणताही प्रकल्प पूर्ण केला नाही़ उच्च न्यायालयाच्या आदेशाने ते पोलिसांसमोर चौकशीला हजर झाले़ पण कोणतीही माहिती त्यांनी दिली नाही़ त्यांना कर्ज देणा-या बँक व्यवस्थापकांची भूमिकाही तपासून पाहायची आहे. त्यांनी अतिशय योजनाबद्धरितीने हा सर्व पैसा वेगवेगळ्या ठिकाणी वळविला आहे. त्यांनी ठेवीदारांकडून गोळा केलेला पैसा त्यांची पत्नी हेमती कुलकर्णी यांच्या वैयक्तिक खात्यात गेला आहे़ ३१ मार्च २०१५ रोजी त्यांनी असे पैसे फिरविले आहेत. त्यांच्या कंपनीचे आॅडिट करणा-या लेखापरिक्षकांचीही भूमिका तपासायची आहे़ त्यांनी इतक्या मोठ्या रक्कमेची काय विल्हेवाट लावली याची तपास करायचा असल्यामुळे त्यांना १० दिवस पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली़

डी़ एस़ कुलकर्णी यांचे वकील श्रीकांत शिवदे यांनी सांगितले की, पोलीस कोठडीला विरोध करणार नाही़ लोकांचे पैसे देण्यावर डीएसके अजूनही ठाम आहोत. जेवढी देणी आहेत, त्याच्या तिप्पट मालमत्ता आमची आहे. १० दिवसांची पोलीस कोठडी जास्त होते़ अत; सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहोत. या युक्तीवादानंतर न्यायाधीश उत्पात यांनी डी़ एस़ कुलकर्णी दाम्पत्यांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली़ 

त्यानंतर अ‍ॅड़ श्रीकांत शिवदे यांनी वकिलांना दररोज २ तास भेटायची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. त्यासाठी त्यांनी वरिष्ठ न्यायालयाचे निकालही सादर केले. त्याला अ‍ॅड़ चव्हाण यांनी आक्षेप घेतला. पोलीस कोठडी दरम्यान पुढे आलेल्या माहितीवरुन जर पोलिसांना काही कारवाई करायची असेल तर या भेटीत वकिलांपर्यंत ही माहिती जाऊ शकते. त्यातून त्या माहितीची विल्हेवाट लावली जाऊ शकते़ त्यावर अ‍ॅड़ शिवदे यांनी आरोपी हे ज्येष्ठ नागरिक आहेत. पुण्यात महिलांसाठी केवळ फरासखाना येथे एकमेव पोलीस कोठडी आहे. त्यातच वेश्याव्यवसाय करणा-या आरोपींपासून सर्व प्रकारच्या महिला आरोपींना ठेवले जाते़ त्यांना अनेक आजार आहेत़ त्यामुळे त्यांची चौकशीसाठी अशी भेट गरजेची असल्याचे सांगितले़ त्यावर न्यायालयाने पोलीस कोठडीच्या काळात दररोज सायंकाळी सात ते साडेसात वाजेपर्यंत वकिलास भेटता येईल, असा आदेश दिला़ 

Web Title: Pune: DKK's seven-day police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.