पिंपरी : न्यायालयात खटला दाखल न करण्यासाठी तसेच दंड न भरण्यासाठी पोलिस कर्मचारी महिलेने भोसरी पोलिस ठाण्याच्या परिसरात एक हजाराची लाच स्वीकारली. त्यानंतर संशय आल्याने महिलेने दुचाकीवरून पळ काढला. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाठलाग करून महिलेला पिंपरी न्यायालयाजवळ पकडले. ही कारवाई शनिवारी (५ एप्रिल) करण्यात आली.रेशमा बाळू नाईकरे (वय ३२) असे कारवाई झालेल्या पोलिस कर्मचारी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दूध विक्रीचा व्यवसाय असलेल्या ३५ वर्षीय डेअरी चालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अमोल भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीचा डेअरी व दुध विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदाराने ३१ मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास डेअरीमधील दूध विक्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्यामुळे कारवाई करण्यात आली. यात तक्रारदार यांना भोसरी पोलिस ठाणे येथे आणून त्यांच्याविरुद्ध खटला भरला होता.
तक्रारदार यांच्या विरुद्धचा खटला न्यायालयात न पाठवता व कोणताही दंड न भरण्यासाठी पोलिस कर्मचारी रेशमा नाईकरे यांनी दोन हजार रुपयांची लाच मागितली. त्याबाबत तक्रारदार यांनी शुक्रवारी (दि. ४ एप्रिल) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने शनिवारी (दि. ५ एप्रिल) लाच मागणीबाबत पडताळणी करण्यात आली. रेशमा नाईकरे यांनी तक्रारदाराविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियमानुसार कारवाई न करण्याकरता सुरुवातीस दोन हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती एक हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
पडताळणीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. त्यावेळी रेशमा नाईकरे यांनी भोसरी पोलिस ठाण्याच्या परिसरामध्ये तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर संशय आल्याने रेशमा नाईकरे तेथून दुचाकीवरून पळून जात होत्या. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाठलाग करून रेशमा नाईकरे यांना पिंपरी न्यायालयाच्या बाहेरील रस्त्यावर पकडले. लाच स्वरुपात स्वीकारलेली रक्कम व मोबाईल फोन जप्त करण्यात आला. रेशमा नाईकरे यांच्यावर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पुणे विभागाचे अपर पोलिस अधीक्षक डाॅ. शीतल जानवे/खराडे, विजय चौधरी, उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अमोल भोसले, पोलिस अंमलदार कोमल शेटे, अश्विन कुमकर, दीपक काकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.