पुणे : हवाई दलातून निवृत्त झालेल्या विंग कमांडरच्या घरातील ५ लाख ८७ हजारांचा ऐवज चोरी करणाऱ्या मोलकरणीला वानवडी पोलिसांनी २४ तासांत अटक केली आहे. सुधा राजेश चौगुले (३५, रा. बोराटे वस्ती, बी. टी. कवडे रोड, घोरपडी गाव) असे पोलिसांनी अटक केलेल्या मोलकरणीचे नाव आहे.
याबाबत सतीश द्वारकादेश मकाशीर (७८, क्रेस्टा सोसायटी, सोपानबाग, घोरपडी) यांनी फिर्याद दिली आहे. मकाशीर हे हवाई दलातून विंग कमांडर पदावरून निवृत्त झाले आहेत. ते आणि त्यांची पत्नी घोरपडी येथील सोपानबाग परिसरातील क्रेस्टा सोसायटीतील सदनिकेत राहण्यास आहेत. त्याच्या घरी सुधा चौगुले ही मोलकरणीन म्हणून कामास आहे. तिने घरातील ५ लाख ८७ हजारांचे सोन्याचे दागिने आणि हिऱ्याचे दागिने असा ऐवज चोरी करून नेला. हा प्रकार २१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट दरम्यान घडला.
याप्रकरणी सुरुवातीला अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुन्ह्याच्या तपासात ही चोरी मोलकरीन सुधा चौगुले हीने केल्याचा संशय आला. तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने चोरी केल्याची कबुली दिली.