पुणे : गुरुवार पेठेतील एका ज्वेलर्स शॉपवर रविवारी चोरांनी डल्ला मारला. चोरांनी चांदीचे होलसेल दुकान असलेल्या शॉपमधून ६७ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी ज्वेलर्स शॉपचे मालक विनोद परमार (४१, रा. मुकुंदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १४) मध्यरात्री चोरांनी गुरुवार पेठ, फुलवाला चौक येथील माणिक ज्वेलर्स या दुकानात चोरी केली. चोर चोरी करण्यासाठी पायी आल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. अर्धा तास चोर ज्वेलर्स शॉपमध्ये होते. व्यावसायिक चांदीचे होलसेल व्यापारी असल्याने मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने शॉपमध्ये होते.
चोरांनी ४० लाख रुपयांचे ४५ किलो वजनाचे चांदीचे पैंजण, १३ लाख ५० हजार रुपयांचे १५ किलो वजनाचे हातातील कडे, चैन, ब्रेसलेट, मासोळी, चांदीचे कॉइन, ९ लाख रुपये किमतीचे १० किलो वजनाचे गणपती, लक्ष्मी, स्वामी समर्थ, गजानन महाराज यांच्या चांदीच्या मूर्ती, ५ लाख रुपये रोख आणि १० हजारांचा डीव्हीआर, असा ६७ लाख ६० रुपये किमतीचा ऐवज गोणीत टाकून चोरून नेला. खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे पुढील तपास करत आहेत. चोरीच्या घटनेनंतर डीसीपी संभाजी कदम, एसीपी अनुजा देशमाने यांनी घटनास्थळी जात माहिती घेतली.
सुरक्षा रक्षकच नाही
जुन्या आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात चांदी असलेल्या ज्वेलरी शॉपला एकही सुरक्षा रक्षक नाही. शॉपचा लाकडी दरवाजा आणि जाळीचे शटर कटावणीच्या साहाय्याने तोडून ३ चोर दुकानात शिरले. त्यानंतर अर्ध्या तासानंतर पाठीवर गोणीत चोरीचा माल घेऊन पायी जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहेत. ज्वेलरी शॉपच्या समोरच असलेल्या एका इमारतीत ज्वेलरी शॉपमधील कर्मचारी राहतात. सोमवारी (दि. १५) पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यातील एका कर्मचाऱ्याला दुकानाचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले, त्यामुळे दुकानात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली.