जेजुरी (पुणे) :जेजुरी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वाल्हे गावानजीक असणाऱ्या धाब्यावर दारूच्या नशेत एका तरुणाच्या डोक्यात वीट आणि बाटलीने मारहाण करून तिघा मित्रांनी त्याला गंभीर जखमी केले. गंभीर जखमी असणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला असून, जेजुरी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
या घटनेत पवन संभाजी शेलार (वय २६, रा. काळदरी, ता. पुरंदर, जि .पुणे, सध्या रा. जेजुरी) या तरुणाचा खून झाला आहे. जेजुरी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, विकास अर्जुन भोसले (रा. पिंगोरी), अविनाश आत्माराम पवार (रा. आडाची वाडी, वाल्हे, ता. पुरंदर, जि. पुणे) यांना अटक केली असून, तिसरा आरोपी तुषार शरद यादव (रा. पिंगोरी) हा पळून गेला आहे.
या घटनेबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १४ रोजी वरील चौघेजण वाल्हेनजीक असणाऱ्या रामा या हॉटेलवर गेले होते. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत पैशांच्या कारणांवरून पवन शेलार व तुषार यादव, विकास भोसले, अविनाश पवार यांच्यात भांडण झाले. यावेळी या तिघांनी पवन शेलार यांच्या डोक्यात वीट व बाटलीने मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले. अशा गंभीर अवस्थेत पवन शेलार याला सोडून तिघे आरोपी पळून गेले.
पवन शेलार याला उपचारासाठी पुणे ससून रुग्णालयात दाखल केले असता उपचारांदरम्यान त्याचा बुधवारी मृत्यू झाला. जेजुरी पोलिसांनी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून यांपैकी दोघांना अटक केली आहे, असे जेजुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी सांगितले. या प्रकरणी आय. पी. एस. अधिकारी दर्शन दुगड, सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे तपास करीत आहेत.