पिरंगुट : मुळशी तालुक्यामधील वळणे या गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.अल्पवयीन मतिमंद मुलीवर एका नराधमाने घरात जाऊन अत्याचार केल्याची दुर्दैवी घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.अधिकच्या माहितीनुसार, शंकर मारुती साबळे (रा. वळणेवाडी, ता. मुळशी) असे नराधमाचे नाव असून ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत पौड पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे. पौड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी ही मतिमंद असून ती केवळ १५ वर्षांची आहे. ती आपल्या कुटुंबासह वळणे गावच्या वाडीमध्ये वास्तव्यास आहे. घटनेच्या वेळी नराधम आरोपी शंकर साबळे हा पीडित मुलीच्या घरी गेला. तेव्हा त्याने घरात जाऊन त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. यावेळी त्या मुलीने त्या नराधमाला विरोध केला तेव्हा त्या नराधमाने तिच्या गळ्यावर,पोटात तसेच पाठीवर बुक्क्यांनी मारहाण केली.यावेळी तिला शिवीगाळ व दमदाटी सुद्धा करण्यात आली. आरोपी हा दारूच्या नशेमध्ये असल्याचे ही पोलिसांनी सांगितले आहे.आरोपीचे हे कृत्य उघडकीस आल्यावर संबधित ग्रामस्थांनी आरोपीस मारहाण केली शेवटी पौड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने पौड (ता, मुळशी) येथे मोर्चा काढण्यात आला. या मुलीवर बलात्कार करून तिला जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करणाऱ्या शंकर साबळे या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी या वेळी या मोर्चा दरम्यान करण्यात आली.
मुळशीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला पौड पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 15:44 IST